नांदेडचा ‘तिरंगा’ फडकतो भारतभर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tricolor of Nanded flies across India Supplies from Delhis Red Fort to Mantralaya

नांदेडचा ‘तिरंगा’ फडकतो भारतभर

नांदेड - दिल्लीचा लाल किल्ला, मंत्रालय आणि देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ग्रामपंचायत आदी कार्यालयांवर स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जो तिरंगा डौलाने फडकताना दिसतो तो नांदेडमध्ये तयार होतो. देशभरात चार ठिकाणी खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती होत असून, त्यापैकी एक नांदेड आहे.

शहरातील हिंगोली गेट येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे कार्यालय आहे. या समितीची सुरुवात वर्ष १९५५ मध्ये झाली आणि संस्था म्हणून १९६७ मध्ये नोंदणी झाली. या समितीच्या वतीने खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात येते. सध्या समितीचे अध्यक्ष म्हणून शिवसांब चवंडा (अहमदपूर, जि. लातूर) आणि सचिव म्हणून माजी आमदार ईश्वरराव भोसीकर (कंधार, जि. नांदेड) काम पाहत आहेत.

यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सचिव भोसीकर यांनी सांगितले. सध्या मागणी जवळपास चौपट झाली असल्याने राष्ट्रध्वजाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीदेखील आम्ही समितीतर्फे रात्रंदिवस काम करीत राष्ट्रध्वजाची निर्मिती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड येथे खादीचे कार, टेबलवरील झेंड्यापासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्‍यासह मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर फडकविण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात येते. ६० रुपयांपासून ते २३ हजार रुपयांपर्यंत या राष्ट्रध्वजाची किंमत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी होते राष्ट्रध्वजाची निर्मिती

खादीच्या कापडापासून राष्ट्रध्वज तयार होत असल्याची माहिती समितीचे लेखा अधीक्षक आर. के. स्वामी आणि निर्मितिप्रमुख सुरेश जोशी यांनी दिली. खादीच्या कापडाची निर्मिती उदगीर (जि. नांदेड) येथे होते. त्यानंतर हे कापड रंगरंगोटी करण्यासाठी अहमदाबाद (गुजरात) येथे पाठविण्यात येते. त्यानंतर नांदेडला त्यावर अशोक चक्र तयार करून नंतर शिलाई करण्यात येते.

नांदेडहून होतो पुरवठा

भारतात खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती ही नांदेड (महाराष्ट्र), हुबळी (कर्नाटक) आणि मुंबई (महाराष्ट्र) या तीन ठिकाणी होते. गेल्या वर्षीपासून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे निर्मिती सुरू झाली असल्याची माहिती समितीचे संचालक व्यवस्थापक महाबळेश्वर मठपती यांनी दिली. मुंबईला खादी ग्रामोद्योग आयोग असून, त्या ठिकाणी सर्व खादी संस्था नोंदणीकृत आहे. या ठिकाणाहून नांदेडच्या समितीकडे राष्ट्रध्वजाची मागणी होते. आतापर्यंत दिल्ली येथील लालकिल्ला, मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायतीपर्यंत राष्ट्रध्वजाचा पुरवठा केला असल्याचे श्री. मठपती यांनी सांगितले.