नांदेडला चोवीस तासानंतर सापडला डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह 

श्याम जाधव | Tuesday, 6 October 2020

पर्यटकां बरोबर अनेक जण पोहण्यासाठी या ठिकाणी नेहमीच येत असतात. परंतु सध्या लॉकडाउन असल्याने आणि मंदिर बंद असल्याने नेहमी सारखी वर्दळ या ठिकाणी नाही.

नवीन नांदेड : विष्णुपुरी येथील शंकर जलाशयात पोहायला गेलेले डॉ. भगवान जाधव हे बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (ता.पाच) सकाळी घडली होती. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध कार्य चालू होते. दरम्यान त्यांचा मृतदेह चोवीस तासानंतर मंगळवारी (ता.सहा) विष्णुपुरी धरणात सापडला.
 
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले नांदेड जवळ असलेले विष्णुपुरी गावात काळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच ठिकाणी आशिया खंडातील मोठा प्रकल्प असून शंकर जलाशय नावाने ओळखले जातो. पर्यटकां बरोबर अनेक जण पोहण्यासाठी या ठिकाणी नेहमीच येत असतात. परंतु सध्या लॉकडाउन असल्याने आणि मंदिर बंद असल्याने नेहमी सारखी वर्दळ या ठिकाणी नाही.

हेही वाचा - ‘स्वारातीम’चे अधिष्ठाता विष्णुपुरी जलाशयात बेपत्ता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव (वय ५३) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शंकर जलाशयात पोहायला गेले.  परंतु अनेक वेळ होऊनही ते घरी परत आले नसल्याने घरच्यांना शोधा शोध सुरू केली. सकाळी ते पोहायला गेले होते अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. घटनास्थळी त्यांची गाडी आणि कपडे आढळून आले. त्यामुळे डॉ. जाधव हे पाण्यात गेल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू झाले. रात्री अंधार पडेपर्यंत अग्निशमन दल, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांचे सहकारी, गोदावरी जीवरक्षक दल तसेच स्थानिक नागरिकांकडून शोध घेण्याचे काम सुरु होते.

हे देखील वाचाच - नांदेड- सोमवारी दोनशे रुग्ण कोरोना मुक्त, पाच जणांचा मृत्यू

दरम्यान डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह चोवीस तासानंतर विष्णुपुरी धरणात थुगाव-कोटतीर्थच्या कडेला मंगळवारी सकाळी तरंगतताना आढळला. घटनास्थळी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  
 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम२०१६ नुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘मानवविज्ञान’ विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. भगवान जाधव यांची निवड झाली होती. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधून २००६ मध्ये डॉक्टरेटची पदवी प्राप्त केलेली होती. विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामध्ये २०१२ पासून अध्यापनाचे कार्य व नॅक सेलच्या समन्वयक पदाचा कार्यभार ते सांभाळत होते. 

येथे क्लिक करा - 

विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता, दूरशिक्षण परिषद, अभ्यास मंडळ, स्थायी समिती, अध्यादेश उजळणी समिती, संशोधन व मान्यता समिती, ग्रंथालय समिती, परीक्षा समिती आदी समित्यांवर त्यांनी कार्य केलेले होते. शिवाय अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य यासह विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे.