नांदेड कोरोना : दोन रुग्णांचा स्वॅब पुन्हा पॉझिटिव्ह, एकाची नव्याने भर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

लॉकडाउन शिथिल केला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. विनाकारण रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी करू नये. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही.  

नांदेड : शनिवारी (ता.सहा) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बरे झालेल्या दोन रुग्णांचा स्वॅब पुन्हा पॉझिटिव्ह आला असून, एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता १९० कोरोना बाधित रुग्ण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शनिवारी आलेल्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आलेला नवीन रूग्ण हा इतवारा भागातील हनुमान चौकातील ६५ वर्षीय वृद्ध आहे.  त्यांना पूर्वीचे काही आजार नाहीत. मात्र सारीची लक्षणे असल्याने ते थेट शासकीय वैद्यकिय रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांचे नमुने घेतले असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे सदर रुग्ण कोणाच्याही संपर्कात आलेला नसून, महापालिकेच्या पथकाकडून अधिकची माहिती घेतली जात आहे.  

हेही वाचा - सुखद : सचखंड गुरुद्वारासाठी आले १७ ट्रक गहू, कुठून ते वाचा -

कुंभारटेकडी येथील दोन कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. मात्र, फेरतपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा दोघांचाहीअहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.  यामध्ये कुंभार टेकडी येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा समावेश असून, दुसरा रुग्ण हा रेशन दुकानदार आहे. कालावधी संपूनही लक्षणे दिसत असल्याने या दोघांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. 

शनिवारी नव्याने एका रुग्णाची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९० वर गेली आहे. तसेच शनिवारी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयातील दोन आणि पंजाब भवन कोवीड सेंटर नांदेड येथील एक अशा तीन रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे. 

कोरोना मिटर 

  • बाधित व्यक्तींची एकूण संख्या १९०
  • १२९ जणांना घरी सोडले
  • ५३ जणांवर उपचार सुरू
  • ८ बाधीतांचा मृत्यू

अधिक रहावे लागणार सजग
रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान बारा तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहावे. तसेच वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Patients Swab Positive Again One Added A New Petient Nanded News