नांदेडात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस : लगातार दोन दिवसात तीन लुटमारीच्या घटना

प्रल्हाद कांबळे | Saturday, 22 August 2020

. ही घटना आसना बायपास पुलावर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : सराफाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याला अनोळखी तीन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून त्याच्याजवळील सोन्या- चांदीचे दागिणे व त्याची दुचाकीसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना आसना बायपास पुलावर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहराच्या भावसार चौक परिसरात अष्टविनायकनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील १३ लाख रुपयांची रोख रक्कम अनोळखी दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आसना पुलाजवळ एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पुढे आली आहे. चोरट्यांनी त्या व्यापाऱ्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पुड टाकल्यानंतर त्याला शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने पळविले. तसेच चोरट्यांनी दागिन्यांसह त्याची दुचाकी (स्कुटी) पळविली.

हेही वाचा गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर

सराफा व्यापारी नंदू लालगे यांना लुटले

प्राप्त माहितीनुसार सराफा व्यापारी नंदू लालगे यांचे अर्धापूर येथे ज्वेलरीचे दुकान असून त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे. अर्धापुर ते नांदेड ते नेहमी ये- जा करतात. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दुकान बंद करून आपल्या स्कुटीवरून ते नेहमीप्रमाणे नांदेडकडे निघाले. नांदेडकडे येत असताना या मार्गावर असताना पुढे काही वाहने असल्याने दुचाकीचा वेगा कमी केला. या दरम्यान त्यांचा पाठलाग करत असलेल्या एका दुचाकीवरुन तिघेजण समोर आले. त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. चाकुचा धाक दाखवून व नंतर डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्यांच्याकडील १०० ग्रॅम सोने, ६०० ग्रॅम चांदी आणि काही रोख रक्कम, दुकानाची किल्ली आणि दुचाकी असा लाखोंचा ऐवज लंपास केला.

अनोळखी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

अचनाक झालेल्या या हल्‍ल्याने सराफा श्री. लोलगे घाबरले. ते आपले डोळे चोळत रस्त्यातच बसल्याने पुन्हा वाहतुक खोळंली. त्यानंतर हा घडलेला प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी कसेबसे नांदेड गाठले. सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सराफा व्यापारी व श्री. लोलगे हे अर्धापूर पोलिस ठाण्यात हजर झाले. रात्री उशिरा अनोळखी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी आपल्या अधिकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली.

येथे क्लिक करा -  शेतकऱ्यांना गुड न्यूज : या परिमंडळातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज

सराफा बाजारमध्ये पोलीस चौकी उभारावी

तीन दिवसापूर्वी नांदेडच्या सराफा बाजारमध्ये तोंडाला रुमाल बांधून ग्राहक बनुन आलेल्या दोघांनी श्री. बोराळे यांच्या दुकानातील काउंटरमधून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिणे लंपास केले होते. या गुन्ह्याचा शोध अद्यापही लागला नाही. बाजारात येणाऱ्या महिलेच्या अंगावरील गंठण पळविण्याचे प्रकारही घड त आहेत. वाढती गुन्हेगारी आणि लुटमार या पार्श्‍वभूमीवर सराफा बाजारमध्ये पोलीस चौकी उभारून सशस्त्र पोलीस दलाची गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील सराफा व्यापारी सुधाकर टाक आणि दिपक बोधणे यांनी केली आहे.