पुतण्या मला वाचव... म्हणण्याची काकावर आली वेळ 

प्रल्हाद कांबळे | Thursday, 13 August 2020

‘काका मला वाचवा’ हे वाक्य तर सर्वांनाच माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील एका घटनेत मात्र याची उलट प्रचिती आली. काकालाच पुतण्या मला वाचव अशी म्हणण्याची वेळ आली.

नांदेड : आतापर्यतच्या इतिहासात त्याचबरोबर राजकारणात काका- पुतण्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे काका आणि पुतण्याच्या नात्याची नेहमीच चर्चा होते. ‘काका मला वाचवा’ हे वाक्य तर सर्वांनाच माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील एका घटनेत मात्र याची उलट प्रचिती आली. काकालाच पुतण्या मला वाचव अशी म्हणण्याची वेळ आली. पुतण्याने केलेल्या करामतीमुळे गावी आलेल्या काकाला थेट कोवीड सेंटरमध्ये जावे लागले. 

मानवी जीवनात उपलब्ध असलेल्या विविध नात्यात काका पुतण्याच्या नात्याची वेगळीच तऱ्हा आहे. विशेष करून आपल्या महाराष्ट्रात तर हे नाते जुन्या काळापासून बऱ्यापैकी चर्चेत आहे. या नात्याच्या विचित्रपनाची झलक या घटनेच्या निमित्ताने पहावयास मिळाली. भोकर तालुक्यातील एका खेडेगावचा मूळ रहिवासी असलेला सुमारे ७० वर्षीय इसम सध्या औरंगाबाद येथे मुलाकडे राहतात. त्यांची या गावात काही मालमत्ताही आहे. त्यामुळे आपल्या मूळगावी त्याचे अधूनमधून येणे जाणे सुरू असते. कोरोना संकटाचे लॉकडाउन सुरू झाल्यामुळे या व्यक्तीला सुमारे पाच महिन्यापासून आपल्या गावी येता आले नव्हते. पण गावच्या मातीची ओढ त्यांना स्वस्थही बसू देत नव्हती. 

हेही वाचा -  नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा
 
काकाला शंभर टक्के कोरोना बाधा असल्याची खात्री पटवून दिली

कोरोना निर्बंध थोडे शिथिल झाल्यावर तब्बल दोन दिवसांच्या कालखंडात अतिशय हिकमतीने टप्प्याटप्प्याचा प्रवास करत या जेष्ठ नागरिकनी अखेर आपले गाव गाठले. आपला काका गावी परतला हे पाहून पुतण्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याला काकांचे गावात येणे अजिबात आवडले नाही. दुसरे म्हणजे हा आता इथेच राहणार ही जाणीवही त्याला बिलकुल सहन झाली नाही. काकांच्या आगमनानंतर एक रात्र उलटताच पुतनोबाने भारी डोके चालवले आणि काकाला गावातून घालवण्याची व्यवस्था केली. गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याने आपल्या काकाला शंभर टक्के कोरोना बाधा असल्याची खात्री पटवून दिली. काकाला अजिबात न झालेल्या त्रासाचे रसभरीत वर्णन ऐकवले व गावाला काकामुळे मोठा धोका असल्याची खात्री पटवून दिली. रुग्णांना हातही न लावता थेट नांदेडला रवाना करण्यात पटाईत असलेल्या त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत गांभीर्याने व मुत्सद्दीपणाने सूत्रे हलवली. 

अर्थातच ती चाचणी निगेटिव्ह निघाली 

याबाबत कसलीही तपासणी न करता त्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरून चक्क पोलिसांची मदत मागवली. पोलीस बिचारे हुकुमाचे ताबेदार..!! त्यांनी  गयावया करणाऱ्या त्या काकांचे थेट गाठोडे बांधले आणि त्यांची रवानगी नांदेड विष्णुपुरी कोविड सेंटरवर करून टाकली. विष्णुपुरी येथे कार्यरत असलेली अधिकारी यंत्रणा या गावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसारखी कार्यक्षम, मुत्सद्दी आणि कर्तव्यदक्ष नसल्यामुळे त्यांनी या काकाला तिथल्या कोरोनावार्डात थेट रवाना केले नाही. अतिशय गांभीर्याने आणि शिताफीने आणल्या गेलेल्या या नागरिकाला तिथल्या डॉक्टरांना कोरोना बाधेची कसलीही लक्षणे दिसली नाहीत. उलट सदरचा व्यक्ती अतिशय ठणठणीत असल्याचे लक्षात आल्यावरून त्यांनी आधी त्या जेष्ठांची कोरोना टेस्ट घेतली. अर्थातच ती निगेटिव्ह निघाली. 

येथे क्लिक करा - विनाअनुदानित शाळांवरील शिक्षक हवालदिल, काय आहे कारण?

पुतण्या पुढे काय चाल खेळतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष

नांदेड कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांनी त्या काकाला तात्काळ गावी जाऊन सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. सध्या आपल्या पुतण्याचे रसभरीत गुणवर्णन करत व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विद्वत्तेचे कौतुक करत हा जेष्ठ नागरिक गावकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. आपल्या काकाचा वचपा काढण्यासाठी त्यांचा पुतण्या पुढे काय चाल खेळतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.