file photo
file photo

नांदेडमधील या गावात तब्बल ४१ वर्षापासून बिनविरोधची परंपरा; सहाव्यांदा सरपंचपदी श्यामराव पाटील टेकाळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : निवडणुकीवरुन होणारे वाद- विवाद गावा- गावात पहायला मिळतात. गाव लहान असो वा मोठे उमेदवारी व पदावरुन रस्सीखेच पाहायला मिळते. पण अमराबाद (ता. अर्धापूर) येथील गावात ग्रामपंचायत गेल्या 41 वर्षांपासून कुठेलेही पार्टीशन नसून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. आजपर्यंत येथे ग्रामपंचायत निवडणूकच झाली नाही. गावातील एकीमुळे गावासह शिवारापर्यंत विकास पोहोचला आहे.

कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने या भागात इसापूर प्रकल्पाने जणू हरीत क्रांती केली. जिल्ह्यातील आमराबाद हिरवाईने नटलेले आहे. गावात ऊस, केळी व हळदीचे मुख्य पीक आहे. जशी शेती फुलवली तशी गावात एकी ठेवून किर्तीही वाढविली आहे. सातशे आठशे लोकसंख्या असलेल्या या गावातील गावकऱ्यांनी 41 वर्षापासून एकाच व्यक्तीला बिनविरोध निवडून देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायतसह सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध होते. यंदाही ही परंपरा राखत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शामराव पाटील टेकाळे यांची निवड केली आहे. 

अमराबाद ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य आहेत.

गावातील लोक एकत्र येऊन उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करतात. श्यामराव पाटील यांची सरपंच किंवा उपसरपंच पदी सातत्याने निवड होत असते. यंदाही सर्वांच्या सहकार्यातून शामराव यादोजी पाटील टेकाळे यांची सरपंचपदी सहाव्यांदा निवड करण्यात आली तर सरस्वतीबाई गुणाजी मुकदम यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी व्यंकटराव कल्याणकर, हरिचंद्र टेकाळे, बाबूराव टेकाळे, मारोतराव पांचाळ, पांडुरंग मुकदम, साहेबराव ढाले, गंगाधर टेकाळे यांनी येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी नेहमीप्रमाणे सहकार्य केले.

शिवारापर्यंत मजबूत रस्ते

गावातील रस्त्याच्या मजबुतीकरणासह शिवाराचेही मजबुतीकरण करुन तब्बल पाच हजारच्यावर झाडांची लागवड केली आहे. सदरील कामे करताना कामाच्या दर्जाबाबत काळजी घेतली जाते. प्रसंगी स्वतः चे पैसेही खर्च करतात. शासनाने दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे करुन तीस वर्षे झाले तरीही रस्ते अजूनही मजबूत आहेत. तसेच शिवारापर्यंत मजबूत रस्ते असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा वाहतुकीचा खर्च वाचतो.

गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सवाच्या अनुषंगाने झाडांची लागवड

या गावात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. गाव स्वच्छ राहील यासाठी सरपंच पाटील स्वतः सूचना करतात. तसेच जवळपास शिव- पाणंद रस्त्यासह गावातील रस्त्यावर जवळपास चार हजारच्यावर झाडे लावण्यात आली आहेत. त्यातच गावातील तरुणही गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सवाच्या अनुषंगाने झाडांची लागवड करतात. त्यामुळे शिवारासह गावही हिरवाईने नटले आहे. गावातील ग्रामपंचायत इमारत, शाळा, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामे पूर्ण झाली असून यंदा 'स्वच्छ गाव-सुंदर गाव' मध्ये सहभाग घेतला आहे. 

आजपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कुठेही नोंद नाही

सरपंच श्यामराव पाटील टेकाळे यांनी आजपर्यत गावातील जे काही किरकोळ वाद असतील ते गावातच मिटवले आजपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कुठेही नोंद नाही. त्यामुळे गावात कायम शांतता असते. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.

अशोक चव्हाण यांच्या घराण्याविषयी एकनिष्ठ असलेले हे गाव

माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण व त्यांचे सुपूत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घराण्याविषयी एकनिष्ठ असलेले हे गाव आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला अत्यल्प मत मिळते. तर काँगेसला मात्र मोठे मताधिक्य नेहमीच असते. पक्षाची एकनिष्ठता लक्ष्यात घेऊन ना. चव्हाण यांनी श्यामराव पाटील यांची नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी व रोजगार हमी योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. 

ज्यावेळी गावातील एकाही व्यक्तीचा विरोध होईल त्या दिवशी माझी सेवा सन्मानाने थांबवेल- श्यामराव पाटील टेकाळे

गेल्या ४१ वर्षांपासून गावकऱ्यांनी मला सेवेची संधी दिली आहे. त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. गावातील  सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळते यामुळे येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवड होते. आणि ज्या दिवशी मला गावातील एकाही व्यक्तीने सेवा थांबविण्याची मागणी केली किंवा विरोध केला त्या दिवसापासून माझी सेवा थांबवू अशी प्रतिक्रिया शामराव पाटील टेकाळे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com