
नांदेड : भाजीपाला, फळांना उन्हाचा फटका
नांदेड : शेतमालाचे दर चांगले असले तरी उत्पादन घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच आता गेल्या महिन्याभरापासून सूर्य आग ओकत असल्याने फळबागा व भाजीपाला ही पिके संकटात आलेली आहेत. जिल्ह्यात जलसंकट नसले तरी वाढलेल्या तापमानाने फळबाग, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनात घट झालेली आहे. सध्याचे तापमान पाहता येणाऱ्या काळात जलसाठ्यात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांचे टेन्शन आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने काही दिवसांपर्यंत जलसाठा बऱ्यापैकी होता. त्यामुळे यंदा टंचाईचे चटके कमी बसतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांतील वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यात घट होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच लघुप्रकल्प, नदी व नाल्यांमधील जलसाठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, शेतामधील विहीरींच्या जलपातळीवरही फरक पडला आहे. अशापरिस्थितीत फळबागा जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
येणाऱ्या काळात फळबागा व भाजीपाला लावलेले शेतकरी पाण्याच्या टंचाईमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तापमानाने चाळिशी कधीचीच पार केली आहे. रोज वाढत चाललेल्या तापमानामुळे येणाऱ्या काळातील संकटांचा अंदाज शेतकरी लावत आहेत. सध्या डाळिंब, केळी, मोसंबी, चिकू आदी फळपिकांसोबतच भाजीपाला अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे. परंतु, तापमानाने फळपीक व भाजीपाला संकटात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतातील फळपिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत आहेत.
- रामेश्वर काळे, फळबागायतदार
जलपातळीत घट होत आहे. परंतु, ड्रीपमुळे अडचण जाणवत नाही. ड्रीपमुळे 75 टक्के पाणीबचत होत आहे. त्यामुळेच सध्या पीक तग धरून आहे. परंतु, वाढते तापमान पाहता येत्या काही दिवसांत फळबाग व भाजीपाला पिकांना फटका बसू शकतो.
- शेख चाॅंद शेख, बागायतदार
वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यात होत असलेल्या घटमुळे उन्हाळी पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या जलपातळी चांगली असली तरी तापमानामुळे पिके संकटात सापडत आहेत.
- कमलबाई साळवे (भाजीपाला उत्पादक शेतकरी)
Web Title: Vegetables Fruits Production Declining Due Summer Farmers Are In Financial Trouble
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..