Video - नांदेडला नाल्याची साफसफाई झाली पण कुठे?

file photo
file photo

नांदेड - महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली असून लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्या संदर्भात बुधवारी (ता. २७) पाहणी केली असता शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आता नाल्याची साफसफाई झाली पण कुठे? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

नांदेड महापालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत काम करण्यात येत आहे. त्यासाठी तीन जेसीबी आणि दोन पोकलेन मशीनची मदत घेण्यात येत आहे. सदरील काम ता. ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिल्या होत्या. आत्तापर्यंत शहरातील आत्तापर्यंत २४२ छोट्या मोठ्या नाल्यापैकी २०३ नांदेड महापालिकेने नाल्यांची सफाई केली असल्याचे  सांगितले होते. 

साफसफाई केली पण कुठे?
नांदेडला दरवर्षी पावसाळ्यात दत्तनगर, नंदीग्राम सोसायटी, अण्णाभाऊ साठे चौक, आनंदनगर, श्रावस्तीनगर, जयभीमनगर, खडकपुरा आदी भाग सखल असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे या भागांची बुधवारी (ता. २७) पाहणी केली असता त्या ठिकाणी नाल्यांची स्वच्छता किंवा साफसफाई केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने साफसफाई केली पण कुठे? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात स्वच्छता हवीच
दरवर्षी उन्हाळ्यात मे महिन्यात पावसाळापूर्व कामे महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात येतात. यात पोकलेन तसेच जेसीबीच्या साह्याने लहान मोठे नाल्यांची स्वच्छता आणि साफसफाई केली जाते. यंदाही ती करण्यात येत आहे मात्र, या कामांचा दर्जा सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

कामे वेळेवर होण्याची गरज
मलनिस्सारण विभागाला पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजची फुटलेली झाकणे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अजूनही अनेक ठिकाणी झाकणे बसवली नसल्याचे दिसून आले आहे. नागरी हिवताप योजनेतंर्गत किटकजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी कार्यक्रम राबवण्याची संबंधितांना जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांनी देखील हे काम वेळेवर करणे महत्वाचे आहे. साथरोग व इतर अनुषंगिक आजारांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आला असला तरी संंबंधित रुग्णांपर्यंत तो जातो की नाही, याची देखील खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

नाल्यांवरील अतिक्रमण हटवावे
नांदेड शहरातील जे काही नैसर्गिक अठरा ते वीस मोठे नाले आहेत. त्यापैकी काही नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असून क्षेत्रीय कार्यालयांनी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमण तत्काळ हटविले पाहिजे. तसेच निळ्या रेषेतील मालमत्ताधारकांना नोटीसा देऊन तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. मोडकळीस आलेली धोकादायक घरे, इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट बांधकाम विभागाच्या समन्वयाने वेळेवर झाले पाहिजे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

अनेक पदाधिकारी, नगरसेवक गायबच
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांना स्वच्छता आणि साफसफाई आपल्या प्रभागात सुरु आहे, याची कल्पना आहे की नाही? हे देखील माहिती नाही. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक गायबच असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com