Video - विष्णुपुरी प्रकल्प भरल्याने एक दरवाजा उघडला

नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प
नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प

नांदेड - गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात शुक्रवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता शंभर टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे १८ दरवाजांपैकी १३ क्रमांकाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. प्रकल्पात वरच्या भागातून पाण्याचा येवा सुरु असल्याने एक दरवाजा उघडून त्यातून ४६३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नांदेड शहरातून गोदावरी नदी वाहते. या नदीवर वरच्या बाजूला विष्णुपुरी येथे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प असून त्यातून नांदेड शहरासह एमआयडीसी तसेच आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा प्रकल्प जुलै महिन्यातच ता. दहा तारखेला शंभर टक्के भरला आहे. 

पूर्णा तालुक्यात अतिवृष्टी
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असलेल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गुरूवारी (ता. नऊ) रात्री अतिवृष्टी झाली. पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात १११ मिलीमीटर, चुडावा ९० तर ताडकळस मंडळात ५३ मिलीमीटर तर सरासरी ५९.४० मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली. त्यामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आणि हे पाणी गोदावरी नदीमार्गे विष्णुपुरी प्रकल्पात आल्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. 

अधिकाऱ्यांनी केली पाहणी 
दरम्यान, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, विष्णुपुरी प्रकल्पाचे पूरनियंत्रक अधिकारी काळगे स्वामी आदींनी विष्णुपुरी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी २४ तास पूरनियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे प्रकल्पाच्या १८ दरवाजापैकी १४ क्रमांकाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

नांदेडकरांची चिंता मिटली
गुरुवारी (ता. नऊ) विष्णुपुरी प्रकल्पात ५८.५६ दलघमी म्हणजेच ७२.४८ टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी (ता. दहा) मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे पूर्णा नदीतून गोदावरी नदीत पाणी आल्यामुळे प्रकल्पात शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शंभर टक्के पाणीसाठा झाला. विष्णुपुरी प्रकल्पात पाणीसाठा शंभर टक्के झाल्यामुळे नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या दोन दिवसाआड नांदेड शहराला पाणीपुरवठा होत असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. 

एक दरवाजा उघडला
विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे एक दरवाजा उघडण्यात आला असून गोदावरी नदीत ४६३ क्युमेक्स विसर्ग होत आहे. त्याचबरोबर प्रकल्पात सध्या दुपारी पाच वाजता ०.५ दलघमी पाण्याचा येवा सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्‍यापर्यंत येईपर्यंत दरवाजा उघडून पाणी सोडण्यास येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com