अर्धापूरातील या गावात ईश्वरी चिठ्ठीने दिली संधी, कालीका पवार ठरल्या भाग्यवान

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 19 January 2021

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी (ता. 18) पार पडली. तालुक्यातील मतदारांना प्रस्थापितांना धक्का देत गावाचा कारभार तरुणांच्या हातात दिला आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचे असते. एका मताच्या फरकाने सरकार येते तसेच जातेही. जेंव्हा मतदार संख्या कमी असते त्या निवडणुकीत एक एक मत महत्वाचे ठरते. याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडीतही आला आहे. शाहपूर (जिल्हा नांदेड) येथील निवडणूकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठीने उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. यात कालीका पवार भाग्यवान ठरल्या असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी (ता. 18) पार पडली. तालुक्यातील मतदारांना प्रस्थापितांना धक्का देत गावाचा कारभार तरुणांच्या हातात दिला आहे. तर काही गावात सत्ता परिवर्तन झाले आहे. शाहपूर गटग्रामपंचायतीच्या एका जागाच्या निकालाने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. येथील ग्रामपंचायत सात सदस्यांची असून पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. दोन जागेसाठी मतदान घेण्यात आले. यात वार्ड क्रमांक तीन (ब) मधून महीला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेले जागेसाठी कालीका भगवान पवार व गोकर्णा राजाराम पवार यांनी लढवली. ही लढत अतिशय चुरशीची व अतितटीची झाली.

हेही वाचा - बिलोली पिडिता प्रकरणात दोषींवर ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई- रामदास आठवले

या दोन्ही काटे की टक्करमध्ये 327 मतदारांनी व एका मतदारांनी टपाली मतदानचा हक्क बजावला. दोन्ही मिळून 328 मतदान झाले. यात कालीका पवार यांना 162 तर गोकर्णा पवार यांना 161 मते व एक टपाली मत असे एकूण 162 मिळाली. तर चार मते नोटाला गेली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात कालीका भगवान पवार भाग्यवान ठरल्या. त्यांना ईश्वरचिठ्ठीने कौल दिला. त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या अटीतटीच्या निवडणूकीत टपाली मताने विजयाचे पारडे फिरवले आहे. तर तालुक्यातील काही उमेदवार एक ते दहा मातांच्या फरकाने विजयी झाले आहे. तेव्हा प्रत्येक मत महत्वाचे आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In this village of Ardhapura, given the opportunity by divine letter, Kalika Pawar became lucky nanded news