मनिरामथड प्रकल्पाची घळभरणी पुनर्वसनाशिवाय अंतिम टप्प्यात; वायफणीचे ५८ ग्रामस्थ बसले आमरण उपोषणास

The village of Waifani has been rehabilitated and work on a new colony has begun..jpg
The village of Waifani has been rehabilitated and work on a new colony has begun..jpg

वाई बाजार (नांदेड) :  माहूर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करणाऱ्या मनिरामथड प्रकल्पाच्या कामाला सन २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर काम सुरु होऊन अंतिम टप्यात आले असून घळभरणीला सुरुवात झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वायफणी गावचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन वसाहतीचे कामास सुरुवात झालेली आहे. 

पुनर्वसन कामात तरतूद केल्यानुसार अधिकांश कामापैकी केवळ शाळा, ग्राम पंचायतीच्या इमारतीचे काम झाले आहेत तर उर्वरित कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने आधी पुनर्वसन वसाहतीचे काम पूर्ण करा व त्यानंतरच घळभरणी करा, अशी मागणी करीत विस्थापित वायफनी गावातील ५८ ग्रामस्थांनी नवीन वसाहतीत जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसमोर (ता.५) फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरु केले. जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली असता जोपर्यंत प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत ते उपोषण आंदोलनावर ठाम असल्याच्या प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त वायफणी येथील ग्रामस्थांनी दिल्या आहेत. 

पुनर्वसित वसाहतीत अनेक सुविधांचा अभाव
 
उपोषणार्थीना जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, करंजी चे उपसरपंच संदीप सिद्धेवार, सामाजिक कार्यकर्ते नावेद खान यांनी भेट देऊन उपोषणार्थीच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यावेळी एकूण ५०० लोकसंख्या, १४५ कुटुंबे व ३८० मतदार असलेल्या वायफनी गावाचे पुनर्वसन करून उभारण्यात येत असलेल्या नवीन वसाहतीमध्ये सुविधांचा अभाव असून शाळेच्या इमारतीचे बांधकाम थातूर मातुर करून खिडक्यांना सज्जे बसविण्यात आलेले नसल्याने पावसाचे पाणी थेट शाळा खोलीत शिरत आहे. ग्रामपंचायत इमारतीचे बांधकामसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. त्यात तोकड्या चटई क्षेत्राच्या आकाराच्या खोल्या बांधण्यात आले. 

अनेक प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्याचे खांब अर्ध्यावर मधातच उभारले असल्याने घर बांधकामास अडचणी येत आहेत. पाणी पुरवठ्याचे टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने टाकी गळत आहे. वसाहतीला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक पाईपलाईन अद्याप उघड्यावर आहे. जुन्या गावात तीन अंगणवाड्या आहेत. परंतु नवीन वसाहतीमध्ये अद्याप एकही अंगणवाडीचे बांधकाम सुरु करण्यात आलेले नाही. नाल्याचे बांधकाम नागमोडी वळणाचे व कमी अधिक खोली व उंची असल्याचे दिसते आहे. काही स्थानिक नागरिकांना पुनर्वसित प्लॉट वाटप करण्यात आले असून अद्याप बरेच नागरिक प्लॉटपासून वंचित आहेत. वाटप करण्यात आलेले प्लॉट लागेबांधे असणाऱ्याना सोयीस्कर देण्यात आले असून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना गावकुसाच्या बाहेर देण्यात आले आहेत.

एकंदरीत या नवीन वसाहत बसविण्याच्या प्रक्रियेत मोठा सावळा गोंधळ होत असून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र इमारत बांधकाम करण्याचे वसाहतीच्या नियोजनात नसल्याचे व वायफणी येथील अनेक ग्रामस्थांनी बोलताना सांगितले. उपोषण आंदोलनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा.हेमंत पाटील, आ.भीमराव केराम, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, कार्यकारी अभियंता बृ.ल.पा.विभाग, तहसीलदार माहूर, स.पो.नि.सिंदखेड यांना देण्यात आल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशीही पुनर्वसन वसाहतीमध्ये उपोषण आंदोलन सुरू आहे.

उपोषणाचे प्रमुख कारण

• प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम निकृष्ट दर्जाचे प्रकल्पग्रस्त नागरिकांचा आरोप.
• नवीन पुनर्वसन वसाहत निर्माण कार्यात नियोजनाचा अभाव असल्याचा ग्रामस्थात संशयकल्लोळ.
• स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतले जात नसल्याचा सरपंचाचा आरोप.


    
नवीन वसाहतीचे काम करीत असताना पुनर्वसीत गावाचे लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन नवीन
वसाहतीचे नियोजन करणे हा नैसर्गिक न्याय आहे. सदर नव्या वसाहतीच्या नियोजनात साधे नैसर्गिक न्याय तत्वाचेही पालन करण्यात येत नसून कुणालाही विश्वासात न घेता थातूर मातुर कामे करण्यात येत आहेत. प्रशासना याकडे लक्ष देऊन वायफणीच्या नागरिकांना न्याय द्यावा.
- नारायण एकनाथ खुपसे, सरपंच, वायफणी.
   
नूतन वसाहत नियोजनात असलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे दिसत आहे. आम्ही जागरूक नागरिक या नात्याने संबधित कंत्राटदाराकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत आहे. तुम्ही चिंता करू नका असे म्हणून उत्तर देत कंत्राटदार वेळ मारून नेत आहेत. प्रत्यक्ष मात्र नाल्यामध्ये कुठेही समान खोलीकरण व सरळीकरण नाही. या व इतर मूलभूत मागण्या जो पर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कुपोषणापासून परावृत्त होणार नाही.
- त्रिशूल माणिकराव कदम, वायफणी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com