गावची चार भागात विभागणी अन् घेतले ४० रक्ताचे नमुने

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

नायगाव :  प्रशासन प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत असून यासाठी आरोग्य पथकांद्वारे गावोगावी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. कहाळा बुद्रुक (ता. नायगाव) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय स्थरावरील आरोग्य पथकाद्वारे रविवारी (ता. २४) ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. या पथकाने सर्वेक्षण करताना नकाशाप्रमाणे गावाचे चार भाग करून प्रत्येक भागातील दहा घरी जाऊन रँडम पद्धतीने रक्ताचे नमुने घेतले आहेत. 

नायगाव :  प्रशासन प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत असून यासाठी आरोग्य पथकांद्वारे गावोगावी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. कहाळा बुद्रुक (ता. नायगाव) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय स्थरावरील आरोग्य पथकाद्वारे रविवारी (ता. २४) ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. या पथकाने सर्वेक्षण करताना नकाशाप्रमाणे गावाचे चार भाग करून प्रत्येक भागातील दहा घरी जाऊन रँडम पद्धतीने रक्ताचे नमुने घेतले आहेत. 

कोरोना विषाणू किती घातक पातळीवर पोचला याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी (ता. २४) नांदेड जिल्ह्यात दाखल झाले असून या पथकाने नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक या गावची निवड करून रँडम पद्धतीने गावात घरोघरी जाऊन चाळीस नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी शेख बालन यांनी दिली.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांची निवड 
देशात कोरोनाचा झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशात कोरोनाचा संसर्ग किती घातक पातळीवर पोचला याचे सर्वेक्षण करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धिपत्याखाली केंद्रीय पथकाची नियुक्ती केली आहे. सदरचे केंद्रीय पथक रविवारी नांदेड जिल्ह्यात आले असून सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांची निवड करण्यात आली. यात नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक गावची निवड करण्यात आली असून हे पथक रविवारी सकाळी तालुक्यातील कहाळा गावात येथे दाखल झाले.

पथकात यांचा समावेश
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पबितवर हे उपस्थित होते. तर आयसीएमआरचे टेक्निशियन हरकळ, आरोग्य सहायक मोरे, लँब टेक्निशियन कंधारकर, अमोल कावळे, रानवाळकर, एएनएम श्रीमती देगावकर, यमलवाड, तेलंग, डॉ. पाटील यांचा समावेश होता. या पथकाने गावात आल्यानंतर अगोदर तेथील नागरिकांना कोरोना विषाणूबाबत माहिती सांगून काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) देशभर काम करीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Video : ‘आयसीएमआर’चे पथक नांदेडात, काय आहे कारण? तुम्ही वाचाच 

ॲपवर नोंदविलेली माहिती दिल्लीला जाणार
सर्व अद्यावत वैद्यकीय उपकरणासह आलेल्या या पथकाने सर्वेक्षण करताना नकाशाप्रमाणे गावाचे चार भाग करून प्रत्येक भागातील दहा घरी जाऊन रँडम पद्धतीने रक्ताचे नमुने घेतले आहेत. रक्ताचे नमुने घेतांना प्रत्येकाचे संमतीपत्रही भरून घेतले आहे. संमतीपत्र भरताना अतिशय सूक्ष्मपणे संबंधितांची माहितीही घेतली असून त्यांच्या ॲपवर नोंदविलेली माहिती थेट दिल्ली येथे जाणार आहे.

हेही वाचा - खळबळजनक :  साधूसह शिष्याच्या हत्येने नांदेड हादरलं

ग्रामस्थांचा पथकाला सकारात्मक प्रतिसाद
सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक कहाळा गावात येणार असल्याने तेथे भीतीचे वातावरण पसरू नये, यासाठी गावातील आशा वर्कर ज्योती गजभारे, डी. आर. कहाळेकर, अंगणवाडी शिक्षिका मालतीबाई देशमुख, भाग्यश्री कहाळेकर यांनी सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वेक्षण व रक्ताचे नमुने घेण्यासाठी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Village Was Divided Into Four Parts And 40 Blood Samples Were Taken, nanded news