सावधान : नांदेडमध्ये एका अधिकाऱ्याला दोन लाखाचा ऑनलाईन गंडा 

प्रल्हाद कांबळे | Sunday, 9 August 2020

एका शासकीय अधिकाऱ्याच्या खात्यातील एक लाख ९८ हजार रुपये पेटीएमद्वारे लंपास केल्याची घटना ता. २९ जुलै रोजी घडली.

नांदेड : शहराच्या नविन मोंढा भागात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतून बोलत असल्याचे सांगून एका शासकीय अधिकाऱ्याच्या खात्यातील एक लाख ९८ हजार रुपये पेटीएमद्वारे लंपास केल्याची घटना ता. २९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौकशीनंतर अखेर पिडीत अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन शनिवारी (ता. आठ) ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकजण घराबाहेर न पडता ऑनलाइन व्यवहाराला पसंती दर्शवत आहेत. मात्र अशा आॅनलाईन व्यवहार करणाऱ्यांवर आॅनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीचे लक्ष आहे. ही टोळी मागील काही दिवसांपासून सक्रीय असूवन यापूर्वीही नांदेड जिल्ह्यातील अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. यातच पुन्हा एकदा ता. २९ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास महाविरनगर येथ राहणारे शासकिय अधिकारी शंकर नारायण वाघमारे यांना एसबीआय शाखा नवीन मोंढा येथील एसबीआय शाखेतून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी आरोपीने श्री. वाघमारे यांचे बँक खाते आणि पेटीएम खात्याची सर्व माहिती जाणून घेतली. बँकेतून फोन आल्यानंतर श्री. वाघमारे यांनी सर्व आपल्या खात्याची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटाच्या आतच वाघमारे यांच्या खात्यातून तब्बल एक लाख ९८ हजार रुपये लंपास करण्यात आले.

हेही वाचा -  कोरोना : “माणसाने माणसाशी माणसासम...” प्रार्थना निनादते ! कुठे ते वाचा?

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ही बाब समजल्यानंतर श्री. वाघमारे यांनी नवीन मोंढा भागातील बँकेत संपर्क साधला. त्यांना आपल्याला ऑनलाईन गंडविल्याचे समजले. बँक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वरील रक्कम काढल्याचे सांगितले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहूळे करत आहेत.

पोलिसांचे आवाहन 

दरम्यान मोबाईल क्रमांकाची माहिती घेऊन चोरटे ऑनलाइन संपर्क साधून बँक खात्याची माहिती घेत आहेत. त्यासाठी बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचा बनाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपल्या खात्याबद्दल किंवा एटीएम क्रमांकाबद्दल कुठल्याही बँकेतून खातेदाराला फोन येत नसून असे फोन आल्यास खातेदारांनी आपली वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

येथे क्लिक करा उपचारासाठी मेट्रो सिटी, नांदेडच्या विकासाची कोरी पाटी...

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी 

शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव पाटीजवळ मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नरेश राघोजी गजभारे यांनी आपले दुकान ता. सहा आॅगस्ट रोजी सायंकाळी बंद करून घरी गेला. अज्ञात चोरट्यांनी त्याच रात्री दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि संगणकाचे ३२ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. नरेश गजभारे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.