नव्या मुहुर्तावर ‘त्या’ ग्राहकांना मंगल कार्यालय उपलब्ध होणार...

file photo
file photo

नांदेड - कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाउन सुरु असून यामुळे अनेकांना लग्नसोहळा पुढे ढकलण्याची वेळ आली. या पार्श्‍वभूमीवर लग्न सोहळ्यांसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी बुकिंग करण्यात आलेले मंगल कार्यालय, लॉन्स, बॅंकेट हॉल चालक व मालकांनी ग्राहकांना अनामत रक्कम परत देण्याऐवजी त्यांना पुढची तारिख बदलून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाउन सुरु करण्यात आला. भारतात आणि महाराष्ट्रात देखील लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ऐन लग्न सराईत विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो जण अडचणीत आले. त्यामध्ये मंगल कार्यालय, टेन्ट, केटरर्स, डेकोरेटर्स, बॅण्ड आदींचा समावेश आहे.

मंगल कार्यालय चालकांची बैठक
दरम्यान, याबाबत नांदेडला नांदेड जिल्हा टेन्ट हाऊस, मंगल कार्यालय, लॉन्स, बॅँकेट हॉल, डेकोरेटर्स, केटरर्स सर्व संघटनेची बैठक शासनाच्या नियमांचे पालन करत घेण्यात आली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. लॉकडाउन उघडल्यानंतर पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह कार्यक्रमांसाठी बुकिंग केलेल्यांना त्याच्या पुढच्या मुहुर्ताच्या वेळी म्हणजे ता. ३१ मार्च २०२०च्या पूर्वी त्या तारखेला बुकिंगसाठी रक्कम ग्राह्य धरुन मंगल कार्यालय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

ग्राहकांचे नुकसान टाळले जाणार
या निर्णयानुसार ग्राहकांचे पूर्णतः नुकसान टाळले जाणार आहे. मात्र, या व्यवसायावर जी असंख्य कुटुंब अवलंबून आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता ग्राहकांना दिवाळीनंतरच्या तारखा बदलून देण्यात येणार आहेत. पूर्वी दिलेली अनामत रक्कम विवाह सोहळ्याचे पुढील बुकिंग करताना वापरता येणार आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी मंगल कार्यालय बुकिंग केले होते. त्यांनी मोजक्या लोकांमध्ये शासकीय नियमांचे पालन करत ठरलेल्या तारखेला विवाह पार पाडले. ते बुकिंगची रक्कम आता परत मागत आहेत. परंतू त्यांना सुद्धा अनामत रक्कम परत देण्यात येणार नसून तसा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्‍ट्र प्रदेशाध्यक्ष दडू पुरोहित आणि नांदेड जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

व्यवसायासमोर मोठे संकट
कोरोनाच्या प्रार्दुभावानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमध्येच लग्न सराईचा हंगाम संपुष्टात आला आहे. शहरात जवळपास शंभर मंगल कार्यालय, लॉन, बॅंकेट हॉल आहेत. या कार्यालयाने व्यापारी दराने येणारे पाण्याचे बिल, घरपट्टी, बिनशेती शेतसारा, देखभाल दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे वेतन, बॅक व्याज आदी गोष्टींचा भार यंदाच्या संकटामुळे मंगल कार्यालयाचे मालक व संचालकांना सोसावा लागणार आहे. या स्थितीत या व्यवसायासमोर देखील मोठे संकट उभे राहिले आहे. यावर देखील व्यवसाय पुनःस्थापनाच्या दृष्टीकोनातून सल्लागारांच्या मार्गदर्शनातून तोडगा शोधला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com