नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस

हफिज घडिवाला  | Tuesday, 29 September 2020

कंधार आगारात ६० ते ६५ बसेस आहेत. यातील पन्नास टक्यांच्यावर बस भंगार आहेत. भंगार गाड्यामुळे प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. ‘

कंधार (नांदेड) : गेल्या १५ दिवसात कंधार आगारातील चार धावत्या बसेसची व्हील नट तुटून चाके निघून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. या घटना भंगार बसेस प्रवाशांच्या सेवेत सोडल्याने उघड झाले असून कंधार आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. आगार प्रमुख मोठ्या अपघाताच्या प्रतीक्षेत आहेत का? असा प्रश्‍न यानिमित्ताने प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. 

गेल्या १५ दिवसामध्ये लोहा तहसील कार्यालयासमोरून जाताना अचानक बसचे (क्र. १५०६) व्हील नट तुटून मागच्या एका बाजूचे दोन्ही चाकं निघून पडले. बस क्रमांक ९६५१ ही गाडी फुलवळच्या उतारावर असताना व्हील नट तुटून चाक बाजूला झाले. तसेच बस क्र. ००७४ आणि बस क्र. २२३० या गाड्यांचेही धावताना व्हील नट तुटून चाके निघून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. आगार प्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया जोर धरू लागल्या आहेत. 

कंधार आगारात ६० ते ६५ बसेस आहेत. यातील पन्नास टक्यांच्यावर बस भंगार आहेत. भंगार गाड्यामुळे प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. ‘सकाळ’ने आगारातील भंगार गाड्यांचा प्रश्न सातत्याने चव्हाट्यावर आणला. परंतु आगार प्रमुख, विभागीय नियंत्रक आणि आरटीओ याकडे लक्ष देत नाहीत. प्रवाशांना मोडक्या आणि बाद गाड्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आगारातील गाड्यांची स्थिती फारच भयावह आहे. अर्ध्या अधिक गाड्यांना स्पेअर टायर्स व टूल नाहीत. स्प्रिंग तुटलेले आहेत. धावतांना अचानक ब्रेक डाऊन होऊन तर कधी बिघाड होऊन गाड्या रस्त्यावर थांबतात. स्पेअर पार्टचा पुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने बऱ्याच गाड्यांचे टायरही फाटलेले आहेत. 

कंधार आगारातील अनेक गाड्यांचे एक्सल बोल्ट तुटलेले आहेत. लोखंडी पाट्यांनी वेल्डिंग करून त्या गाड्या रस्त्यावर धावतात, हा प्रकार भयानकच आहे. या जीवघेण्या प्रकाराकडेही ‘सकाळ’ने प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. सुरक्षित प्रवास असल्याने आदळआपट सहन करून प्रवासी भंगार गाड्या असल्यातरी जीवमुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे बाजूलाच राहिले, महामंडळ प्रवाशांना चांगल्या गाड्या सुद्धा उपलब्ध करून देत नसल्याचे चित्र आहे. 

अन्यथा भविष्यात मोठा अपघात

धावत्या गाडीचे व्हील नट तुटून चाके निघून पडणे या घटना साध्या व सोप्या नाहीत. प्रवाशांचे दैव बळकट होते म्हणून त्यांचे जीव वाचले. अन्यथा अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असती. आगार प्रमुख व विभागीय नियंत्रकाच्या उदासीनतेमुळे कंधार आगाराची दुरवस्था होत असल्याचे पुढे येत आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आंधळं दळतं...असा प्रकार झाल्यास कंधार आगारातील गाड्यातून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

संपादन - सुस्मिता वडतिले