नांदेड ते होटल सायकलिंग करीत डॉ. विपीन यांनी दिला पर्यावरण वृद्धीबरोबरच निरोगी आरोग्याचा संदेश

अनिल कदम
Sunday, 17 January 2021

होटल येथील हेमाडपंती वास्तू पुढील पिढीसाठी अनमोल ठेवा..डॉ.विपिन

देगलूर ( जिल्हा नांदेड ) : भारत सरकारच्या फिट इंडिया अभियान व वसुंधरा अभियानाअंतर्गत इंधन बचत करीत सायकलिंग करण्याचा संदेश तरुणांना देत रविवार (ता. १७) रोजी नांदेड ते होटल परत होटल ते नांदेड असा 200 किमीचा प्रवास सायकलिंगवर करीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पर्यावरणवर्दी बरोबरच तंदुरुस्त शरीरासाठी सायकलिंग वापरण्याचा संदेश दिला. 

रविवार (ता. १७) रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन विटणकर यांनी नांदेड येथील सायकलिंग ग्रुप समवेत सकाळी साडेसहा वाजता सायकल प्रवासाला नांदेडवरुन सुरुवात केली. मजल- दरमजल करीत ते साडेअकराच्या दरम्यान देगलूरला पोहोचले. तेथे त्यांचे नगरपरिषद व प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

हेही वाचाग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार- उदय सामंत

 नगरपरिषदेने उभारलेल्या सेल्फी पॉइंटला त्यांचा यथोचित सन्मानही करण्यात आला. त्यानंतर त्यांनी होटलकडे रवाना झाले. तेथे त्यांनी हेमाडपंथी मंदिराची पाहणी करुन चालू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी होटल येथील हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा अलौकिक असून तो पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी व या भागातील पर्यटन वाढीतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रोत्साहन देण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. 
   
उर्वरित विकास कामासंदर्भात या विभागाची लवकरच आढावा बैठक नांदेड येथे घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सायकलिंग ग्रुप मध्ये महिला वर्गांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यावेळी तरुणांनी व्यसनापासून दुर राहण्याबरोबरच इंधन बचतीसाठी दैनंदिन व्यवहारात सायकलचा वापर करावा, त्यामुळे पर्यावरणवृद्धीला मोठे बळ मिळेल त्यातून युवकांचे शरीरही निरोगी राहण्याबरोबरच तंदुरुस्त राहण्यास मोठी मदत मिळेल असे सूचक विधान जिल्हाधिकारी डॉ. विटणकर यांनी यावेळी केले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी होटल येथे चालू असलेल्या विकासकामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While cycling from Nanded to the hotel Dr vipin nanded news