कोणाला बसणार ‘धक्के’ अन् कोणाला मिळणार ‘फुलांचे बुके’

karnataka_gram_panchayat.jpg
karnataka_gram_panchayat.jpg


हदगाव, जि. नांदेड ः तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ९५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.१५) रोजी निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ५९ हजार ९०८ पुरुष मतदारांनी तर ५२ हजार ९५९ महीला मतदारांनी असा एकूण १ लक्ष १२ हजार ८६९ मतदारांनी एकूण ८० टक्के मतदान करून मतदानाचा हक्क बजाविला. तालुक्यातील तामसा, निवघा, मनाठा या ग्रामपंचायत निकालांकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असतांनाच आज निकालाअंती ‘कोणाला बसणार धक्के अन् कोणाला मिळणार फुलांचे बुके’ याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 


महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी 
मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या गावातील ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या नसल्याने त्याठिकाणीही निवडणूक पार पडली. मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊन आमदार जवळगावकर व माजी आमदार आष्टीकर यांचे समर्थक दिलीप बास्टेवाड, आनंद घंटलवार, रमेश घंटलवार, बालाजी महाजन या समर्थकांनी महाविकास आघाडी स्थापन केली. तर त्यांना बाबुराव कदम कोहळीकर समर्थक माधव नारेवाड व विशाल परभणकर, पंडीत पाटील यांनी कडवे आव्हान दिले होते. 

कडवे आव्हान 
निवघा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच राहीलेल्या आमदार आष्टीकर समर्थक संदिप कदम व साहेबराव माटाळकर यांच्या विरोधात आमदार जवळगावकर समर्थक भास्करराव कदम यांनी व बाबुराव कोहळीकर समर्थक मधू पाटील व श्याम पाटील यांनी तसेच एस.डी. पाईकराव यांनी कडवे आव्हान दिले होते. मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या निवघा या ग्रामपंचायतीत मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. मनाठा येथे शंकर पाटील, खुदबोद्दीन काझी, सुनिल चौरे, बबलु वाठोरे यांनी आमदार जवळगावकर समर्थक मारोतराव शिंदे, सुहास शिंदे यांना कडवे आव्हान देत माजी आमदार आष्टीकर समर्थक उत्तमराव शिंदे यांनी शामराव पाटील, अशोक पाटील, संभा सुर्यवंशी यांनी एक पॅनल उभे करून आपलीही ‘ताकद’ विरोधकांना दाखविली. मनाठा येथील प्रतिष्ठित मानले जाणारे नरेंद्र मालिवाल यांनी शंकर पाटील यांच्या बाजुने तर त्यांचेच पुतणे दिपक मालिवाल यांनी उत्तमराव शिंदे यांचे बाजुने आपले वजन खर्च केले. 


कोण ठरणार सरस 
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाणारी तामसा ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जवळगावकर व माजी आमदार आष्टीकर यांची छबी एकाच बॅनरवर बघावयास मिळाली असून फक्त याच ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. अन्यत्र मात्र जवळगावकर व आष्टीकर यांच्या समर्थकांनी परस्परविरोधातच ही निवडणूक लढवली. विधानसभा निकडणूक अपक्ष म्हणुन लढविलेल्या कोहळीकरांनी तामसा व निवघा या ठिकाणी आपल्या समर्थकांच्या आग्रहाखातर या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला असला तरीही मात्र तामसा व निवघा या दोन मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने त्यांच्या समर्थकांच्या बाजुने किती कौल दिला हे निकालाअंतीच स्पष्ट होईल. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com