ऑन स्क्रीन : गोष्ट  ‘नरम-गरम’ आयुष्याची...  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ludo-Movie

अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व राजकुमार राव यांचा जबरदस्त अभिनय यांच्या जोरावर चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन करतो.

ऑन स्क्रीन : गोष्ट  ‘नरम-गरम’ आयुष्याची... 

अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व राजकुमार राव यांचा जबरदस्त अभिनय यांच्या जोरावर चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन करतो. पात्रांची गर्दी आणि तुकड्यांतील सर्व कथानकं जोडताना उडालेला थोडासा गोंधळ या त्रुटीही आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘ल्युडो’तील चार घरं, म्हणजे चार कथानकं आहेत बिट्टू तिवारी (अभिषेक बच्चन), आकाश व श्रुती (आदित्य रॉय कपूर व सान्या मल्होत्रा), राहुल व शिजा (रोहित सराफ व पर्ल मानये) आणि आलू गुप्ता व पिंकी जैन (राजकुमार राव व फतिमा साना शेख) यांची. बिट्टूचं सत्तू भैया (पंकज त्रिपाठी) या गुंडाशी जुनं वैर आहे व त्यातून सत्तूनं बिट्टूला तुरुंगात डांबलं आहे. बिट्टूच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्यानं त्याची कोंडी झाली आहे. मोठं कर्ज फेडल्यास बिट्टूला त्याची पत्नी व मुलगी परत मिळणार आहे. आलूची प्रेयसी पिंकीचं लग्न झालंय, मात्र तो तिला विसरलेला नाही. यातच पिंकीचा नवरा खुनाच्या प्रकरणात अडकतो व ती मदतीसाठी आलूकडं येते. आकाशला श्रुती एका विचित्र परिस्थितीत भेटते व तिचं लग्न ठरलेलं असताना आकाश त्यातील अडथळा बनतो. पैशांसाठी हापापलेल्या राहुल आणि शिजाचाही कथानकात प्रवेश होतो. या सर्वांचं आयुष्य सत्तू नावाच्या फाशात अडकतं व प्रत्येकाला आपलं आयुष्य पुढं नेण्यासाठी झालेल्या गुंत्यातून पाय सोडवायचा आहे. यातून कथानक भन्नाट ट्विस्ट घेत एका टप्प्यावर येऊन पोचतं व ‘आयुष्य म्हणजे ल्युडोचा खेळ आहे, फासे जसे पडतील तसं ते पुढं सरकतं,’ हे सत्य सांगत संपतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कथा अनेक पातळ्यांवर पुढं सरकत असल्यानं व पात्रांच्या गर्दीच्या जोडीला कथानकातही अनेक ट्विस्ट असल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. मात्र, दिग्दर्शकानं शेवटाकडं जाताना सर्व पात्रांची कथा एका पातळीवर आणल्यानं धमाल येते. प्रत्येक पात्राच्या कथेला अनेक आयाम आहेत व ती खूपच मनोरंजक असल्यानं प्रेक्षक गुंतून राहतो. या आलूचं पात्र व त्याचं प्रेमप्रकरण धमाल विनोदी आहे, तर बिट्टूच्या कथेला अनेक हळवे कोपरे आहेत. आकाशचं श्रुतीवर मनापासून प्रेम आहे, तर श्रुतीला फक्त पैसा प्रिय आहे. राहुल आणि शिजाचं प्रेम फक्त व्यवहार पाहतं. प्रत्येकाच्या समस्येचं उत्तर (किंवा मूळ समस्याच) सत्तूभैया आहे आणि तोच फासा बनून या प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा ठरवत राहतो. शेवटी ‘ल्युडो’च्या पार्श्‍वभूमीवर पाप व पुण्याचं गणित समजावून सांगत हा खेळ संपतो. 

अभिनयाच्या आघाडीवर अभिषेक बच्चन व पंकज तिवारी भाव खाऊन जातात. अभिषेकला त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी धीरगंभीर भूमिका मिळाली आहे आणि अनेक प्रसंगांतील त्याचा अभिनय दृष्ट लागण्यासारखा झाला आहे. पंकज त्रिपाठी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे व या चित्रपटातही सत्तूभैया साकारताना त्यांनी धमाल केली आहे. राजकुमार रावनं साकारलेला मिथुनची स्टाइल मारणारा प्रियकरही भाव खाऊन जातो. आदित्य रॉय कपूर व त्याचा बाहुलाही धमाल. सान्या मल्होत्रा, फतिमा शेख, रोहित सराफ आदी सर्वच कलाकार छान साथ देतात. 

एकंदरीतच, ‘किस्मतकी हवा कभी नरम, कभी गरम’ या मास्टर भगवान यांच्या गाण्याचा आधार घेऊन सुरू होणारी ही कथाही थोडी नरम, थोडी गरमच आहे...

Edited By - Prashant Patil