नवा चित्रपट : बुलबुल : भयपट ते परीकथा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bulbul

बुलबूल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. भयपटाविषयी आपल्याला नेहमीच सूप्त आकर्षण वाटतं. बुलबूल भयपट असूनही, परीकथेच्या अंगानं जात सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो.

नवा चित्रपट : बुलबुल : भयपट ते परीकथा!

बुलबूल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. भयपटाविषयी आपल्याला नेहमीच सूप्त आकर्षण वाटतं. बुलबूल भयपट असूनही, परीकथेच्या अंगानं जात सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चित्रपटाची कथा आहे १८८१च्या बंगालमधील बुलबूल नावाच्या मुलीची. तिचा विवाह लहानपणीच इंद्रनील ठाकूरशी लहानग्या बुलबुलला आपलं लग्न नक्की कोणाशी झालंय याचीदेखील कल्पना नसते. इंद्रनील मोठा जमीनदार असतो. त्याला महेंद्र आणि सत्या हे दोघं भाऊ आहेत. महेंद्र हा इंद्रनीलचा जुळा भाऊ मानसिकदृष्ट्या अविकसित आहे, तर बुलबुलच्याच वयाचा आहे. पहिल्याच भेटीत बुलबूल आणि सत्याची गट्टी जमते. भल्या मोठ्या हवेलीमध्ये छोट्या बुलबुलला सत्या आधार देतो. चेटकीण आणि भुतांच्या कहाण्यांमध्ये दोघं हरवून जातात. कथा २० वर्षं पुढं जाते. लंडनला शिकायला गेलेला सत्या पुन्हा बंगालला परततो. गेल्या काही वर्षांमध्ये घराचं चित्र संपूर्ण पालटतं. उलट्या पायांच्या चेटकिणीची गावामध्ये चर्चा असते आणि तिनं अनेकांचा बळी घेतला असतो.

महेंद्रची हत्या होते तर, इंद्रनीलचा पत्ता नसतो. एवढ्या मोठ्या हवेलीमध्ये असते फक्त बुलबूल. उलट्या पायाच्या चेटकिणीचा शोध लावायचा निश्चय सत्या करतो. बुलबुलच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रसंगांची, समाजात होणाऱ्या सत्यघटनांची ही हादरवणारी कथा असून, समाज आणि पुरुषी मानसिकतेवर भाष्य करणारा मास्टरपिस आहे. चेटकिणीच्या कल्पनेचा वापर करून स्त्री आणि देवीला जोडण्याचा प्रयत्न दिसतो. दिग्दर्शक अन्विता दत्त यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम आणि प्रसंग सुंदर चित्राप्रमाणं रंगवला आहे.

कलाकारांची निवड ‘बुलबुल’ची मोठी जमेची बाजू. तृप्ती डिमरी आणि पाओली दम यांनी आश्चर्यकारक काम केलं आहे. बुलबूल आणि बिनोदिनीचा एकुणच बंगाली शृंगार लक्षवेधी आहे. तृप्ती बुलबुलच्या पात्रात परिपूर्ण दिसते. बडे ठाकूर इंद्रनील आणि त्याचा जुळा भाऊ महेंद्रच्या दुहेरी भूमिकेत राहुल बोस परफेक्ट. शहाणा नवरा, वेडा मेहुणा, अनियंत्रित माणूस अशा अनेक छटा त्यानं छान रंगवल्या आहेत. अविनाश तिवारीनं सत्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘छोटी बहू’ बिनोदिनी पाओलीनं ताकदीनं पेलली आहे. परमब्रत चट्टोपाध्याय छोट्या भूमिकेत लक्षवेधी ठरतात.  

सिनेमॅटोग्राफी, लाल रंगामधील फ्रेम आणि भयपट असूनही थेट काळजाला भिडणारं संगीत ही चित्रपटाची आणखी वैशिष्ट्यं. उगाच ताणलेली कथा ही त्रुटीही जाणवते. भयपट असूनही परीकथेप्रमाणं जाणारा हा चित्रपट अजिबात घाबरवत नाही. तरीही चांगली कथा, दिग्दर्शन, कलाकारांचा नेटका अभिनय यांमुळं तो कंटाळवाणा होत नाही, हे नक्की !

Edited By - Prashant Patil