
हिंदी चित्रपटांतील बायोपिकची परंपरा पुढं नेणारा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट सर्वार्थानं वेगळा आहे. शकुंतला देवींच्या गणितातील अनोख्या बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी गोष्ट, त्यांचे खासगी आयुष्य व जिद्दी स्वभावाचा कथेत करून घेतलेला उपयोग, विद्या बालनची जबरदस्त अदाकारी ही वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट सुरवातीपासूनच पकड घेतो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं तो मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात अडचण आली असली, तरी तो हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड नक्कीच ठरावा.
शकुंतला देवी - विद्या शपथ; भन्नाट
हिंदी चित्रपटांतील बायोपिकची परंपरा पुढं नेणारा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट सर्वार्थानं वेगळा आहे. शकुंतला देवींच्या गणितातील अनोख्या बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी गोष्ट, त्यांचे खासगी आयुष्य व जिद्दी स्वभावाचा कथेत करून घेतलेला उपयोग, विद्या बालनची जबरदस्त अदाकारी ही वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट सुरवातीपासूनच पकड घेतो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं तो मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात अडचण आली असली, तरी तो हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड नक्कीच ठरावा.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘शकुंतला देवी’ची कथा शकुंतलाच्या बालपणापासून सुरू होते. लहान असतानाच ती भावाच्या पुस्तकातील मोठी गणितं तोंडी सोडवत असते. तिच्या वडिलांना आपल्या मुलीच्या या वेगळ्याच हुशारीची कल्पना येते व घरातील गरिबीमुळं ते तिचा उपयोग गणिताचे कार्यक्रम करून पैसे मिळवण्यासाठी करू लागतात. शकुंतला (विद्या बालन) मोठी होते व हेच कार्यक्रम करून पैसा व नाव कमावते. मात्र, आपल्या आई-वडिलांनी शिक्षण पूर्ण करू दिलं नाही याचा तिच्या मनात राग असतो. विशेषतः आईनं वडिलांना विरोध केला असता, तर शिक्षण पूर्ण झालं असतं अशी तिची धारणा बनते. त्यामुळंच आयुष्यात आईसारखं व्हायचं नाही, असा ध्यास घेते. अमेरिकेसह जगभरात तिचे गणिताचे कार्यक्रम सुरू होतात, ती संगणकालाही मागं टाकत गणितं सोडवते व जगभरात तिची कीर्ती पसरते. या प्रवासात तिला पुरुषी अहंकाराचा अनेकदा सामना करावा लागतो, मात्र ती जिद्दीनं प्रवास सुरू ठेवते. तिची भेट परितोष बॅनर्जी (जिशू सेनगुप्ता) या तरुणाबरोबर होते व ते विवाहबद्ध होतात.
एक मुलगी झाल्यावर परितोष तिला पुन्हा जगभरात दौरे करण्याची परवानगी देतो, मात्र मुलीशिवाय एकटं राहणं अवघड गेल्यानं ती मुलीला घेऊन दौरे करू लागते. शकुंतलाची मुलगी अनुपमाला (सान्या मल्होत्रा) या दौऱ्यांचा कंटाळा येतो व आई व मुलीत संघर्ष पेटतो. शकुंतला अपाम पैसा व नाव कमावते, मात्र पती व मुलीपासून दुरावत जाते. शकुंतलाच्या गणिती ज्ञानाचं व कौटुंबिक नातेसंबंधांचं काय होतं हे चित्रपटाचा शेवट सांगतो.
या चित्रपटाची तुलना गणितज्ज्ञ जॉन नॅश यांच्या जीवनावर बेतलेला ‘अ ब्युटीफूल माइंड’ व श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावरील ‘अ मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या दोन चित्रपटांशी होणं स्वाभाविक आहे. वरील दोन्ही चित्रपटांत चरित्रनायकाचं गणितीज्ञान व त्यात त्यांनी केलेल्या महान कार्यावर भर होता, तर हा चित्रपट महिला म्हणून शकुंतला देवींना कराव्या लागलेल्या संघर्षाचीही गोष्ट सांगतो. शकुंतला देवींची गणिती हुशारी पटवून देणारे अनेक प्रसंग कथेच्या ओघात येतात, त्यामुळं चित्रपट काही ठिकाणी कंटाळवाणा होतो.
त्यात दिग्दर्शिका अनू मेनन यांनी कथा सांगताना फ्लॅशबॅकचा अतिरेकी वापर केला आहे. चित्रपटात काही वेळा पाच मिनिटांत पाचपेक्षा अधिक फ्लॅशबॅक आले आहेत! मात्र, हे प्रसंग खूपच मनोरंजक असल्यानं पाहताना मजा येते. चित्रपटाचा शेवट मेलोड्रामा पद्धतीनं केला असला, तरी तो आई व मुलीच्या नात्याचा एक छान पदर उलगडून दाखविण्यात यशस्वी होतो.
विद्या बालनचा अभिनय ही अर्थातच चित्रपटाची मोठी जमेची बाजू. अनेक पदर असलेली ही भूमिका तिनं मोठ्या कष्टानं साकारली आहे. स्टेजवर हसणारी, विनोद करणारी मात्र खासगी आयुष्यात थकलेली, खचलेली शकुंतला साकारताना तिनं केलेला अभ्यास पडद्यावर दिसतो. सान्या मल्होत्रानं आईविरुद्ध बंड उभारलेल्या मुलीची आक्रमक भूमिका ताकदीनं उभी केली आहे. जिशू सेनगुप्ता व सान्याच्या पतीच्या भूमिकेत अमित सध चांगली साथ देतात.
एकंदरीतच, काही त्रुटी असल्या तरी, शकुंतलाच्या भाषेतच सांगायचं तर, विद्या शपथ, पिक्चर भन्नाट आहे...
Edited By - Prashant Patil