नवी ‘रंग’दृष्टी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

‘डार्क इज ब्युटिफूल’ ही मोहीम जगभरात सुरू झाली असली, तरी नंदितानं भारतात तिला बळ देताना तिच्यातला नकारात्मक भाव कमी केला. तिनं या मोहिमेला एक सकारात्मक मूल्य दिलंच.

वर्णावरून केल्या जाणाऱ्या भेदभावाविरुद्ध अभिनेत्री नंदिता दास ठामपणे उभी राहिली. ‘इंडिया हॅज गॉट कलर’ ही तिची मोहीम आज अनेकांसाठी प्रेरक ठरते आहे. ‘डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेकडे भारतातल्या विविधतेचं ‘सेलिब्रेशन’ म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, असा एक वेगळाच मुद्दा तिनं मांडला आणि ‘इंडिया हॅज गॉट कलर’ असं नवीन नाव दिलं. तिनं या मोहिमेला एक सकारात्मकतेची किनार दिल्याने ती जास्त महत्त्वपूर्ण ठरली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौंदर्य केवळ रंगात किंवा वर्णात असतं का? काळा, सावळा, गव्हाळ वर्ण असलेली व्यक्ती सुंदर नसते का? फक्त गोरी व्यक्ती हीच सुंदर कशी काय?...अभिनेत्री नंदिता दास हे प्रश्न विचारते. ती केवळ हा प्रश्न विचारून थांबत नाही, तर चुकीच्या रंगदृष्टीमुळे व्यथित झालेल्या अनेक व्यक्तींनाही विश्वास प्रदान करते. आज नंदिता दास तिच्या अभिनयामुळे जितकी प्रसिद्ध आहे, तितकंच तिनं रंगदृष्टी या वेगळ्या विषयावर केलेल्या कामामुळेही अनेकांची लाडकी झाली आहे. रंगावरून टिप्पणी करणं हे किती क्लेशकारक ठरतं हे तिनं अतिशय स्पष्टपणे सांगितलंच आणि ती फक्त एवढंच करून थांबली नाही, समाजाची रंग‘बाधा’ संपवण्यासाठी तिनं एक मोहीमच सुरू केली. ‘इंडिया हॅज गॉट कलर’ ही तिची मोहीम आज अनेकांसाठी प्रेरक ठरते आहे. 

उद्यमशीलतेला ‘चंदेरी’ झळाळी

‘डार्क इज ब्युटिफूल’ ही मोहीम जगभरात सुरू झाली असली, तरी नंदितानं भारतात तिला बळ देताना तिच्यातला नकारात्मक भाव कमी केला. तिनं या मोहिमेला एक सकारात्मक मूल्य दिलंच; पण अनेकांना सोबत घेऊन त्याला एक बळही दिलं. ‘डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेकडे भारतातल्या विविधतेचं ‘सेलिब्रेशन’ म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, असा एक वेगळाच मुद्दा तिनं मांडला आणि ‘इंडिया हॅज गॉट कलर’ असं नवीन नाव दिलं. ती फक्त प्रचार मोहीम करून थांबली नाही, तर तिनं आता ‘शेड्स ऑफ इंडिया’ नावाची स्टोअर्सही सुरू केली आहेत. सगळ्या रंगांच्या महिलांसाठी योग्य ते कपडे तिथं मिळतात. नंदितानं तिच्या मोहिमेची एक ‘अँथम’ही तयार केली आहे आणि त्यात रत्ना पाठक-शाह, गुल पनाग, राधिका आपटे, स्वरा भास्कर अशा अनेकांनी योगदान दिलं आहे. एकीकडे रंगाबाबत जागरूकता वाढवतानाच नंदिता चित्रपटांबाबतही सजग आहे. विशेषतः दिग्दर्शक म्हणून तिनं केलेले दोन चित्रपट ‘फिराक’ आणि ‘मंटो’ हे आहेत. त्यावरूनच तिचं वेगळेपण लक्षात यावं. नंदिता अनेक विषयांवर अतिशय प्रगल्भपणे आणि भिडभाड न ठेवता मतं मांडते आणि जगभरात गरिबीपासून एकात्मतेपर्यंत विविध विषयांवर भाषणंही देते. मृणाल सेन, ऋतुपर्ण घोष, अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दिग्दर्शकांना या उत्तम अभिनेत्रीबरोबर काम करावंसं वाटतं, त्यात तिच्या अभिनयकौशल्याबरोबरच तिचा अभ्यास आणि ती त्या व्यक्तिरेखांना देत असलेला बुद्धिमत्तेचा टच या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या. स्वतःच्या वर्णाचा कोणताही अडसर न मानता अतिशय आत्मविश्वासानं सगळ्यांच्या खांद्याला खांदा आणि डोळ्यांना डोळे भिडवून उभी राहणाऱ्या नंदिताचा हा प्रवास प्रेरक आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘‘महिलांना विशिष्ट प्रकारे दिसण्याबाबत खूप दबाव असतो. एकीकडे पुरुषी दृष्टी त्याला कारणीभूत असतेच; पण महिलांमध्येही वर्णाबाबत विशिष्ट समज असतातच. हा दृष्टिकोनच बदलायला हवा.’’ 
नंदिता दास, अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Nandita das dark is beautiful