
महिलांसाठी अनुभवाचे बोल
नववीत असताना खूप शिकलेला मुलगा मिळाला म्हणून लग्न लावून आई-वडिलांनी कर्तव्य पार पाडलं. उच्चशिक्षित जावई मिळाला म्हणून खूप कौतुक झाले. वर्षभराच्या कालखंडात सासरच्या मंडळींची परिस्थिती समजली. उच्चशिक्षित पती हा मनोरुग्ण निघाला. याच काळात मी गर्भवती राहिले. माहेरच्या मंडळींना परिस्थिती लक्षात आणून दिल्यावर पतीसोबत घटस्फोटाचा निर्णय झाला. घटस्फोट झाल्यावर सासरहून काही मिळण्याची शक्यता नव्हती. भविष्यात माहेरवाशीण होऊन दिवस काढणेही अवघड होते.
गर्भवती असल्याने पुनर्विवाहासही अडचण होती. समाजासाठी मुलगी की मुलगा होणार हाही मोठा प्रश्न होता. होणारे अपत्य माझे भविष्य आहे, असे समजून मी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू केली.
नियती प्रत्येक क्षणाची दिव्यपरीक्षा घेत होती. यातून आईचे निधन झाले. तीन भाऊ असताना कोणीही आधार दिला नाही. मोठ्या बहिणीने हिंमत दिली. बंद पडलेले शिक्षण सुरू करण्याचा सल्ला दिला. अपत्य झाल्यावर बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. माहेरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाची इच्छा असतानाही शिक्षणाची दारे बंद झाली होती. योगायोगाने मुलगा झाला.
भविष्यात मुलाने उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करावे, ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत मेहनत घेतली. मुलाला शिक्षणाच्या बाबतीत काही कमी पडू दिले नाही. शिवणकाम करून रोजगार सुरू केला. संकटात सापडलेल्या अनेक महिलांना कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले. महिलांना स्वावलंबी बनता यावे, यासाठी गावात पहिला महिला बचतगट काढला.
यातून महिलांच्या गरजा भागवून अनेक महिलांना त्यांच्या पायावर उभे केले. सध्या आशा कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहे. मुलानेही आईच्या- माझ्या कष्टाचे सोने करीत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो कंपनीत नोकरीला असून, आता एम.ई.साठी प्रवेश घेतला आहे.
(शब्दांकन - धोंडोपंत कुलकर्णी)