...आता थुंकणेही हायजेनिक!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

थुंकायचे तरी कोठे, हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. या प्रश्‍नाचे एकदम सोपे उत्तर नागपूरमधील एका २५ वर्षीय तरुणीच्या ‘इझी स्पीट’ या स्टार्टअपने शोधले आहे. 

स्वच्छतागृहासाठी शहरात व घरात स्वतंत्र जागा दिली जाते. एखाद्याला सिगारेट ओढायची असल्यास त्यासाठी वेगळे झोन केले जातात. मात्र, थुंकायचे असल्यास  जागोजागी ‘येथे थुंकू नका’ असेच वाचायला मिळते. सार्वजनिक ठिकाणे व कार्यालयांत थुंकण्याची कोठेही स्वतंत्र सोय नसते. त्यामुळे थुंकायचे तरी कोठे, हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. या प्रश्‍नाचे एकदम सोपे उत्तर नागपूरमधील एका २५ वर्षीय तरुणीच्या ‘इझी स्पीट’ या स्टार्टअपने शोधले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसर्गजन्य किंवा इतर कोणताही आजार असलेली व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास त्यातून आजार पसरू शकतो. कोरोनाकाळात कोठेही थुंकणे अधिक धोक्‍याचेच आहे. टीबीचा रुग्ण उघड्यावर थुंकल्यास त्यापासून १० लोकांना संसर्ग होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे. मात्र, थुंकी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ती आपण थांबवू शकत नाही. पण, वाट्टेल तेथे थुंकल्यास इतरांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे थुंकण्याची स्पेस या स्टार्टअपने निर्माण केली आहे. ‘इझी स्पीट’ने थुंकण्यासाठी पाऊच, ग्लास आणि स्पीट डिमची निर्मिती केली असून, ती वैयक्तिक व सार्वजनिक वापरासाठी सोईस्कर ठरते. वापरून झाल्यानंतर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट देखील लावता येते. रितू मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा आणि प्रतीक हरडे यांनी ऑक्‍टोबर २०१९ मध्ये या स्टार्टअपची स्थापन केली. त्यांच्या कंपनीत ३७ कर्मचारी असून, त्यातील २७ महिला आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिचकारी बंद होईल  
तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणांतून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. पिचकाऱ्या मारून रंगलेल्या या जागा साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी आणि अनेक कर्मचाऱ्यांचे श्रम लागतात. अशा सर्व ठिकाणी थुंकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास स्वच्छता वाढून रोगराई कमी होण्यास मदत होऊ शकते. 

या समस्या सोडविण्याचे ध्येय
थुंकण्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे. 
थुंकीतून पसरणारे आजार थांबावे. 
सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता कमी व्हावी. 
पिचकाऱ्यांची घाण स्वच्छ करण्यासाठी पाणी, वेळ व पैसा वाचावा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘येथे थुंकू नका,’ असे सांगणारे खूप आहेत. आम्ही मात्र ‘इझी स्पीट’मध्ये ‘येथे थुंका’ असे सांगत आहोत. उघड्यावर थुंकण्यातून बिघडणारे सामाजिक आरोग्य व अस्वच्छता लक्षात घेता; त्यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. त्यातून नक्कीच ‘स्वच्छ भारत’ची व्याप्ती वाढेल. 
- रितू मल्होत्रा,  सहसंस्थापिका, इझी स्पीट

(शब्दांकन : सनील गाडेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritu Malhotra article about Ezyspit Startup