#SundayMotivation : गुड मॉऽऽर्निंग पुणे... मैं हूँ नीता! (व्हिडिओ)

नीला शर्मा
Sunday, 29 September 2019

आईकडून प्रेरणा
वस्त्यांमधील रहिवाशांना रेशन कार्ड मिळणं, त्यावर धान्य उपलब्ध होणं, वस्तीत भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या... यांसारख्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नीता तुपारे यांनी माध्यम समर्थकांना याची जाणीव करून दिली. ‘‘कष्टाचं जिणं जगलेल्या माझ्या आईकडून मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली,’’ असं त्या आवर्जून सांगतात.

कर्तृत्वाचे पंख पसरून भरारी घेणाऱ्या, स्वतःबरोबरच सामाजिक योगदानाचेही भान असणाऱ्या महिलांच्या कार्याची नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून ओळख...

वाडीवस्तीतल्या महिलांच्या सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जीवन जगलेली, त्यांच्या सुख-दुःखांचा अनुभव असलेली आणि त्यांची भाषा बोलणारी रेडिओ जॉकी मिळणं म्हणजे संवाद चटकन साधला जाण्याची मोठी सोय. नीता तुपारे यांची ही कामगिरी तळागाळातील महिलांना सामाजिक उन्नतीसाठी मोलाची ठरली आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील वाडीवस्तीत कोणेएकेकाळी मेस चालवणाऱ्या नीताताई यांच्या प्रगतीचा आलेख विस्मयचकित करणारा आहे. स्वतःच्या प्रगतीबरोबरच वाडीवस्तीतल्या असंख्य महिलांनाही प्रगतीच्या वाटा दाखवण्याचा ध्यास त्यांना रेडिओ जॉकी या उल्लेखनीय टप्प्यापर्यंत घेऊन आला. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या कम्युनिटी रेडिओ सेंटरमध्ये नीताताई आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. 

त्या म्हणाल्या, ‘‘या सेंटरमध्ये वाडीवस्तीतल्या महिलांना कला सादर करण्यासाठी बोलावतात. शासकीय पातळीवरील योजनांची माहिती देणारे कार्यक्रम या सेंटरमार्फत घेतले जातात. सुरवातीला मी त्यात सहभागी होण्यासाठी येत असे. मला हे काम फार छान वाटलं. मी पुढाकार घेऊन अनेक जणींना यात सामावून घेऊ लागले. इथल्या वरिष्ठांनी मग मला कामाच्या खूप संधी उपलब्ध करून दिल्या.

वाडीवस्तीतल्या महिलांशी त्यांच्याच बोलीभाषेत मी संवाद साधू लागले. आता खूप आत्मविश्वासाने मी रेडिओ जॉकी म्हणून या महिलांना नवनव्या शासकीय योजनांमध्ये सहभागी करते. त्यांच्यातील कलागुणांना आमच्या रेडिओ सेंटरवरून कसा वाव मिळेल, यासाठी सतत प्रयत्न करते. संहितालेखन, सादरीकरण, संबंधित यंत्र हाताळणं, हे दुसऱ्याला शिकवू शकणं हे सगळं आज मी सहज करते, याचं समाधान आहे.’’

नीताताईंचं शिक्षण नववीपर्यंतच होतं. कम्युनिटी रेडिओसाठी काम करता करता त्यांनी पुढे शिकायचं ठरवलं. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आज त्या मराठी विषयात पदवी परीक्षेसाठीच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी सांगितलं, ‘‘हे सगळं लग्नानंतर, तीन मुलींच्या जन्मानंतरचं आहे. आपण ठरवलं तर वय, गृहिणी असणं वगैरे काही आड येत नाही. अडचणी येतच असतात. त्या कुणाला चुकल्या आहेत? पण आपण त्यांतून मार्ग काढायचा असतो. आपण पुढे जाता जाता आणखी कुणाला प्रगतीच्या दिशेने नेता आलं तर ते समाधान फार मोठं असतं.’’

  नववीपर्यंत शिकलेल्या स्त्रीची उत्तुंग भरारी
  वाडीवस्तीतल्या महिलांशी त्यांच्या बोलीत हितगुज 
  संहितालेखन ते प्रसारणापर्यंतचं तंत्र आत्मसात 
  आपल्याबरोबरच इतरांच्या उन्नतीचा ध्यास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday Motivation Nita Tupare radio jockey Success