esakal | तयारी नवरात्रोत्सवाची;अंबाबाईच्या अलंकारांची झाली स्वच्छता
sakal

बोलून बातमी शोधा

navratri colours of 2019 preparation at kolhapur ambabai temple

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या आवारापासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंतची स्वच्छता पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था व मंडप उभारणीची कामेही पूर्ण झाली आहे. मंदिरात आज देवीच्या चांदीच्या अलंकारांसह भांड्यांची तसेच अन्य वस्तूंची स्वच्छता झाली.

तयारी नवरात्रोत्सवाची;अंबाबाईच्या अलंकारांची झाली स्वच्छता

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या आवारापासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंतची स्वच्छता पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था व मंडप उभारणीची कामेही पूर्ण झाली आहे. मंदिरात आज देवीच्या चांदीच्या अलंकारांसह भांड्यांची तसेच अन्य वस्तूंची स्वच्छता झाली. यामध्ये प्रभावळ, कटांजल, मानाची काठी,पंचारती आदी चांदीच्या वस्तूंचा त्यात समावेश होता. दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रात्री सारा मंदिर परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघणार आहे.

देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,सदस्य शिवाजीराव जाधव,राजेंद्र जाधव यांनी आज दुपारी मंदिर परिसर, महाद्वार कमानीलगत उभारलेल्या बॅरिकेड्‌सची पाहणी केली. ओवऱ्यामधील दुकानदारांना आणि महाद्वार कमानीलगतच्या दुकानदारांना दारात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. अंबाबाई मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करणारे सिधोजी घोरपडे-सरकार यांचे वंशज यशराज घोरपडे आणि कुटुंबीयांचा देवस्थान समितीतर्फे आज सकाळी सत्कार झाला. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार झाला. श्री अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला आज तीनशे चार वर्षे पूर्ण झाली. सिधोजी घोरपडे-सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली होती. या पार्श्‍वभूमीवर हा सत्कार झाला.

नवरात्र उत्सवात पार्किंग व्यवस्था जास्तीत जास्त ठिकाणी करा, वीज उपकरणातून धोका होऊ नये, याची काळजी घ्या, भाविकांना दर्शन रांगेत कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाच दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. मंदिरात सुरक्षा व्यवस्था दर्जेदार असावी, दर्शन रांगेत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी मंडप आणि पायघड्या असाव्यात, विद्युत रोषणाई करताना वायर अथवा अन्य उपकरणे उघड्यावर असू नयेत, विद्युत उपकरणापासून कोणताही धोका होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. नियंत्रण कक्ष सुसज्ज असला पाहिजे. साधारण 10 हून अधिक स्वयंसेवी संघटना नवरात्री उत्सवात कार्यरत असणार आहेत, त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्या, भाविकांबरोबर सौजन्याने बोला, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या-त्या ठिकाणी करा, अशा सूचना देऊन पार्किंगसाठी विशेष लक्ष देण्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी लक्ष वेधले.