Navratri festival 2019 : गुजराती नृत्याला अहिराणी गीतांचा ठुमका

योगेश बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

नवरात्रोत्सवा दरम्यान अनेक नवीन गाणी आली असली तरी 'सेतल कुरमा बागो भाग्य मारो, सुतो सोनिडो जाइजो जवान लाल ढम मारिया रे लाल, धम मारिया' तसेच 'पंखिडा रे उडीन जाजो पावागढ रे, माताजी ने जैन के जो की गर्भा रमे रे, पंखिड़ा, रे पंखिड़ा' ना गुजराती गीता ने आजही तरुणाईला भुरळ घातली आहे. याचबरोबर 'डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार', 'भाऊ मना सम्राट', 'कसा करू शिणगार', 'या अंबाबाईला, या मायबाईना', 'असा कसा देवाचा देव लंगडा', 'कानड पाणी ले गई रे कान्हा', 'रत काय चाल ना नांदुरी गडले' आदी गाण्यांची ग्रामीण भागात धूम आहे

मालेगाव  : नवरात्रोत्सवातील गरबानृत्य व टिपऱ्यांची धूम वाढली आहे. विशेष म्हणजे उत्सवात अहिराणी गीतांवर ठुमका धरला जात असून, या गाण्यांची सर्वत्र धूम आहे. शहरातील काही मंडळांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून नृत्यात सहभागी होत आहेत. येथील काही मंडळांनी दांडिया व गरबा खेळण्यासाठी रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत तिकीट ठेवण्यात आले आहे.नऊ दिवसांमध्ये उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या जोडीला बक्षीसे देण्यात येणार आहेत. विविध दुकानांमध्ये राजस्थानी, पंजाबी, नऊवारी, चुनरी लेंगा, गरबा ड्रेस, मारवाडी ड्रेस अशा विविध प्रकारच्या वेशभूषा बघायला मिळत आहेत. मात्र त्याला फक्त शहरी भागातून मागणी असून, तीदेखील कमी प्रमाणात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

देवीची गाणी व खानदेशी गीतांचाच बोलबाला
सायंकाळी पाच वाजेनंतर सभामंडपात देवीची गाणी व खानदेशी गीते सुरू होतात. रात्री आरतीनंतर टिपरीनृत्याला सुरवात होते. टिपरी नृत्य व गीतांमुळे कॅम्प, संगमेश्वर, सोयगाव, कलेक्टर पट्टा, नववसाहत आदी भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक नवीन गाणी आली असली तरी सेतल कुरमा बागो भाग्य मारो, सुतो सोनिडो जाइजो जवान लाल ढम मारिया रे लाल, धम मारिया' तसेच 'पंखिडा रे उडीन जाजो पावागढ रे, माताजी ने जैन के जो की गर्भा रमे रे, पंखिड़ा, रे पंखिड़ा' ना गुजराती गीता ने आजही तरुणाईला भुरळ घातली आहे. याचबरोबर 'डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार', 'भाऊ मना सम्राट', 'कसा करू शिणगार', 'या अंबाबाईला, या मायबाईना', 'असा कसा देवाचा देव लंगडा', 'कानड पाणी ले गई रे कान्हा', 'रत काय चाल ना नांदुरी गडले' आदी गाण्यांची ग्रामीण भागात धूम आहे.

वंदे मातरम मंडळाने साकारले महालक्ष्मी मंदिर

मालेगाव कॅम्प भागातील वंदे मातरम मंडळाने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे मंदीराची आकर्षक प्रतिकृती साकारली असून या ठिकाणी रात्री गरबा नृत्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष जगदीश गोऱ्हे यांनी 'सकाळ' ला सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in navratri gujarati dance famous with Ahirani songs