Navratri Festival 2019 :  मनोरंजनासह समाजसेवा

नीला शर्मा
Saturday, 5 October 2019

कथक नृत्यातून समाजाचं मनोरंजन करण्याबरोबरच गरजू रुग्णांना अर्चना पटवर्धन आर्थिक मदत पुरवतात. उपचारांचा खर्च झेपत नसलेल्या मूत्रपिंड, कर्करोग व हृदयरोगग्रस्तांपैकी काहींना त्यांनी आतापर्यंत मदत पुरवली आहे.  

अर्चना नृत्यालयामार्फत पंचवीस वर्षांपासून देश-परदेशांत कथक नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या अर्चना पटवर्धन यांची नृत्यसेवेद्वारे समाजाला मदत करण्याची कामगिरी मोलाची आहे. त्यांचे पती विश्राम पटवर्धन हे डायलिसिसवर असताना उपचारांसाठी येणारा खर्च मोठा होता. नृत्याच्या कार्यक्रमांसाठी निधी उभारायला न्यास स्थापन करायची कल्पना सुचली. नंतर ठरलं, की समाजातील गरजू रुग्णांच्या आर्थिक खर्चातला खारीचा वाटा उचलावा. नृत्य कार्यक्रमांसाठी वीस टक्के व रुग्णांना मदत म्हणून ऐंशी टक्के रक्कम वापरता येईल, अशा प्रकारे न्यास चालवायचं ठरलं. ‘अर्चना नृत्यालय व वैद्यकीय प्रतिष्ठान’ पंधरा वर्षांपूर्वी स्थापन झाला. अर्चना यांचे पती मुद्दाम यात विश्वस्त झाले, कारण यानुसार त्यांना यातून मदत घेता येणार नव्हती. घरात गरज असूनही, या दोघांनी सामाजिक बांधिलकी जपायचा निर्णय घेतला. 

अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘नंतर माझे पती गेले; पण हे काम भक्कमपणे सुरू राहिलं. न्यासातर्फे नृत्याचे कार्यक्रम करून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातील ठरावीक भाग आतापर्यंत दोन रुग्णालयांना देणगी म्हणून दिला. सुरवातीला काही जवळच्या व्यक्तींनी मदत दिली. परिचितांपैकी काहीजणांनी प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी देणग्या दिल्या. नृत्यालयाच्या स्मरणिकेसाठी जाहिरातींद्वारे रक्कम मिळाली. खास मदतीसाठी केलेल्या कार्यक्रमातून पैसे मिळाले. अशा प्रकारे जमलेल्या निधीतून न्यासातर्फे नृत्याचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करून, त्यात मदत दिली जाते. डायलिसिसवर असणारे, कर्करोगग्रस्त व हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या गरजूंना येणाऱ्या खर्चातला हा खारीचा वाटा असतो. ज्यांना मदत द्यायची आहे, त्यांना मंचावर बोलावून त्यांच्या हातात मदत दिली जाते.’’

अर्चनाताईंच्या कथक नृत्यवर्गाच्या सिंहगड रस्ता, नारायण पेठ व पाषाणमधील शाखांमध्ये तरुणी ते प्रौढ वयाच्या महिलादेखील शिकतात. गृहिणी ते आयटी क्षेत्रातील नोकरदार महिला त्यात असतात. कलेला वयाचं बंधन नसतं, असं अर्चनाताई मानतात. प्रतिकूल परिस्थितीतून सावरत, पुढे सरसावत आज त्या इतरांना मदतीचा हात  द्यायला सज्ज आहेत, हे वाखाणण्याजोगं आहे. 

नवरात्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archana patwardhan article Social service with entertainment