
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवातील अष्टमीचा हा मुख्य सोहळा असून त्याच्या तयारीला मंदिरात प्रारंभ झाला आहे. श्री तुळजाभवानीची आज दीपपूजा बांधण्यात आली. रविवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन होऊन प्रदक्षिणेला प्रारंभ होईल. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी देवीचे स्वागत होईल.
तुळजाभवानी मंदिरात पानाचा विडा देऊन देवीचे स्वागत होईल. नगरप्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद होतील आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ होईल. दरम्यान, न्यू गुजरी तरुण मंडळातर्फे यंदा नगरप्रदक्षिणा मार्गावर केवळ व्हाईट मेटल लाईटस् लावल्या जाणार आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर विद्युतरोषणाईला मंडळाने फाटा दिला आहे. मात्र, विविध प्रबोधनात्मक रांगोळ्या आणि प्रसादाची परंपरा कायम ठेवली जाणार असल्याचे किरण नकाते यांनी सांगितले.
५४ फेऱ्या अन् पाच हजार भाविक
केएमटी आणि श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या माध्यमातून काल ललिता पंचमीच्या सोहळ्याच्या निमित्ताने मोफत बससेवा उपक्रम राबवण्यात आला. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत चार बसेसच्या एकूण ५४ फेऱ्या झाल्या. सुमारे पाच हजाराहून अधिक भाविकांना या सेवेचा लाभ मिळाला.
प्रतिभा थोरात यांचे आज गायन
प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात यांची अंबाबाई मंदिरात उद्या (शनिवारी) ‘भावभक्ती स्वरबहार’ ही मैफल रंगणार आहे. सायंकाळी सात वाजता या मैफलीला प्रारंभ होईल. संग्राम पाटील यांची स्वरसाथ, प्रिया लांजेकर यांचे निवेदन तर अमित कुलकर्णी, सुरेश कदम, राजू चौंडकर, प्रफुल्ल शेंडगे यांची संगीतसाथ असेल.