भवानी मंडपात महाराणी ताराराणींचे तख्त दर्शनसाठी खुले

भवानी मंडपात महाराणी ताराराणींचे तख्त दर्शनसाठी खुले

कोल्हापूर - नवरात्रात देवतांचे विविध रुपात दर्शन घडते आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या रणरागिणी ताराराणींनी अतुलनिय शौर्याचा इतिहास घडविला, त्या करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या तख्ताचे (आसन) दर्शन घ्यायची संधी नवरात्राच्या निमित्ताने मिळाली आहे.

महाराणी ताराराणींचे हे तख्त भवानी मंडपात फक्त नवरात्राच्या काळापुरते दर्शनासाठी खुले राहणार आहे. या तख्तासोबत शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या तख्ताचेही दर्शन घेता येणार आहे. नवरात्र म्हणजे, केवळ धार्मिक उत्सव नव्हे; तर शौर्याचा इतिहास घडविलेल्या ताराराणींच्या शौर्याला म्हणजेच त्यांच्या तख्ताला जवळून मुजरा करण्याची संधी घेता येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा ताराराणींनी पन्हाळगडावरील त्यांची राजधानी हलवून कोल्हापुरात आणली. व करवीर संस्थानाची स्थापना केली. तत्पूर्वी, ताराराणींनी आपली शौर्याने औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुला घाईल आणले. आपल्या धुरंदर खेळीने ताराराणी या नावाचे इतिहासात वलय निर्माण केले. 

करवीर संस्थांचा कारभार नवीन राजवाडा बांधण्यापूर्वी जुन्या राजवाड्यापासूनच केला गेला. हा जुना राजवाडा आज आजुबाजुच्या वर्दळीमुळे त्याचे मुळ अस्तित्व हरवून बसला आहे. या राजवाड्यातच 1857 च्या उठावाचा सशस्त्र इतिहास घडला. उठावाचे सुत्रधार म्हणून चिमासाहेब महाराजांना राजवाड्यातूनच ताब्यात घेऊन त्यांना कराचीला पाठविण्यात आले. फिरंगोजी शिंदे या क्रांतीकारकासह अनेकांना जुन्या राजवाड्याच्या प्रांगणातच गोळ्या झाडून ठार मारल्याचा इतिहास आहे. 

ताराराणीच्या वास्तव्याचा आणि अशा शौर्याचा इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुन्या राजवाड्यात आतील बाजूस सात चौक आहेत. त्यापैकी भवानीचे मंदिर व भवानी चौक हा मुख्य चौक आहे. या चौकात भवानीच्या गाभाऱ्याशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे व शाहू महाराजांचे तख्त आहे. दसऱ्याला शाहू महाराजांचा परिवार या तख्ताला आपट्याची पाने अर्पण करतात. याच ठिकाणी दरवर्षी फक्त नवरात्रात ताराराणींचेही तख्त ठेवले जाते. तख्त म्हणजे, सिंहासना ऐवजी त्यांचे छोटे आसन हे असून त्यावर मखमली कापड टाकून झालेले असते. हे तख्त म्हणजे, त्यांच्या स्मृतीचे प्रतिक मानले जाते. त्याचे नियमित पूजन केले जाते. फक्त ताराराणींचे तख्त नवरात्रापुरते दर्शनासाठी बाहेर काढले जाते. त्यामुळे नवरात्रातच जवळून हे ताराराणींचे आसन पाहण्याची संधी मिळते. 

दर्शनापेक्षा मोलाचे 
नवरात्र म्हणजे, लखलखाट, झगमगाट, मोठ्या मुर्ती नवदुर्गा दर्शनासाठी झुंडीच्या झुंडी असे स्वरुप झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर नवरात्रातच दर्शन घेता येणारे ताराराणीचे आसन हे वेगळी संधी आहे. कारण साक्षात औरंगजेबाशी झुंज देणारी ही ताराराणीरुपी नवदुर्गा आहे. आणि तिचे आसन जवळून पाहायला मिळणे, हे इतर ठिकाणी चारतास रांगेत थांबून मिळणाऱ्या दर्शनापेक्षा खूप मोलाचे आहे. 

या तख्ताची आम्ही खूप काळजी घेतो. या तख्ताची पूजन करतो. महापुरुषांचे हे तख्त म्हणजे, इतिहासाची साक्ष देणारे एक प्रतिक आहे. आम्ही नवरात्रात शौर्यशाली ताराराणींचे तख्त ही दर्शनासाठी ठेवतो. त्यानंतर प्रथेनुसार ते सुरक्षित जागी ठेवतो. 
-  बाळकृष्ण दादर्णे,
भवानी मंदिर पूजक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com