कल्याण-डोंबिवलीतील सांस्कृतिक कार्यक्रमावर कोरोनाचे सावट

मयुरी चव्हाण-काकडे 
Friday, 13 March 2020

कल्याण-डोंबिवली शहरात नववर्ष स्वागतयात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, ही सर्वांची इच्छा असली तरी यंदा कोरोनाच्या विषाणूमुळे या सांस्कृतिक कार्यक्रमावर काहीसे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे आयोजकांनी याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. तसेच अनेक महोत्सवही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात नववर्ष स्वागतयात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, ही सर्वांची इच्छा असली तरी यंदा कोरोनाच्या विषाणूमुळे या सांस्कृतिक कार्यक्रमावर काहीसे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे आयोजकांनी याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. तसेच अनेक महोत्सवही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गुढी पाडव्याला काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेमुळे सांस्कृतिक उपराजधानी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराची ओळख सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक, शाळकरी विद्यार्थी, विविध संस्था मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. ही स्वागतयात्रा पाहायला हजारो नागरिकही रस्त्यावर उतरतात. या वेळी मोठी गर्दी उसळते. कोरोनो आजाराची खबरदारी घेताना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन केले जात आहे.

ही बातमी वाचा ः कोरोनाच्या धास्तीने मुंबई- पुणे प्रवास मंदावला

तसेच गर्दीच्या ठिकाणी गेल्यास काय काळजी घ्यावी, याविषयीही माध्यमातून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. ऐतिहासिक कल्याण शहरातही स्वागतयात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रम शहरांची शान असले, तरी या वेळी प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत. 

मिसळ महोत्सव रद्द 
डोंबिवलीतील स्वागतयात्रेचे आयोजन गणेश मंदिर संस्थानमार्फत केले जाते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक यंदा कोणती खबरदारी घेतात ते पाहावे लागेल. गुरुवारी ठिकठिकाणी शिवसजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदा हा उत्सव जास्त न लांबविता लवकर संपविण्यात आला, अशी माहिती सेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. तर मनसे डोंबिवली शाखेच्या वतीने 13 ते 15 मार्च या कालावधीत मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनसेचे पदाधिकारी ओम लोके यांनी सांगितले. 

प्रशासनाकडून ज्या सूचना देण्यात येतील, त्यांचे आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत. 
- राहुल दामले, अध्यक्ष, गणेश मंदिर संस्थान 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Saw on cultural program in Kalyan-Dombivali