कोरोनाच्या धसक्‍याने ठाणे जिल्ह्यात सॅनिटायझरचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धसका नागरिकांनी घेतला आहे. तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना दप्तरातून सॅनिटायझरची बाटली आणण्याचे फर्मान सोडले आहे. आरोग्य विभागाकडूनही नागरिकांना हात स्वच्छ धुण्याच्या सूचना केल्या जात असल्याने मेडिकल दुकानातबन सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. अशा वेळी ठाणे शहरासह जिल्ह्यात बहुतांश मेडिकल स्टोअरमध्ये सॅटनिटायझरचा तुटवडा भासत आहे.

ठाणे : जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धसका नागरिकांनी घेतला आहे. तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना दप्तरातून सॅनिटायझरची बाटली आणण्याचे फर्मान सोडले आहे. आरोग्य विभागाकडूनही नागरिकांना हात स्वच्छ धुण्याच्या सूचना केल्या जात असल्याने मेडिकल दुकानातबन सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. अशा वेळी ठाणे शहरासह जिल्ह्यात बहुतांश मेडिकल स्टोअरमध्ये सॅटनिटायझरचा तुटवडा भासत आहे. काही दुकानांमध्ये त्यासाठी नोंदणी करून घेतली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही सॅनिटायझरचा तुटवडा आहे. 

एकाच वेळी पुरवठा कमी आणि मागणी अधिक वाढल्याने मेडिकल दुकानात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ठाण्यातील उथळसर, नौपाडा, कोपरी, घोडबंदर रोडवरील औषध दुकानांमध्ये सॅनिटायझर मिळेनासे झाले आहेत, अशी माहिती औषध दुकानदारांनी दिली. दरम्यान, सॅनिटायझरऐवजी साध्या साबणानेदेखील हात धुण्यास हरकत नसल्याचे ठाणे केमिस्ट असोसिएशनचे सचिव विजय सुराणा यांनी सांगितले. सॅनिटायझर वितरकाकडेच स्टॉकमध्ये उपलब्ध नसल्याने दुकानातदेखील मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महत्त्वाचे ः थांबा! तुम्ही बाजारातून आणलेले सॅनिटायझर डुप्लीकेट तर नाही ना ?
ठाणे शहरातील औषध दुकानांचा आढावा घेतला असता बहुतांश दुकानांमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे दिसून आले. या संदर्भात बोलताना केमिस्ट जितेंद्र जैन म्हणाले, ठाण्यात सुमारे 800 मेडिकल स्टोअर्स असून या दुकानांना दोन वितरकांकडून जंतुनाशक औषध व विविध ब्रॅण्डच्या सॅनिटायझरचा पुरवठा केला जातो. सध्या कोरोनामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली असून दररोज 100 ते 150 ग्राहक सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी येतात.आपली लोकसंख्या पाहता मागणी अधिक व पुरवठा मात्र अल्प होत असल्याने मार्केट पॅनिक झाले आहे. पूर्वी वर्षभरात सॅनिटायझरची एखादी बाटली विक्री होत होती.आता घाऊक विक्रेत्याकडे 50 सॅनिटायझरची मागणी नोंदवली; तर अवघे पाचच नग मिळत आहेत. 

एका मेडिकलमधून साधारण 15 ते 20 सॅनिटायझरची विक्री दिवसाला व्हायची. परंतु कोरोनाविषयी जनजागृती होत स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करा, असे समजताच नागरिकांनी मेडिकलमध्ये धाव घेत सॅनिटायझर; तसेच मास्कची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांत सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. आता तर आमच्याकडे साठाच शिल्लक नाही. कंपनीकडे मागणी केली आहे, परंतु कंपनीकडे माल शिल्लक नसल्याचे आम्हाला सांगण्यात आल्याने आम्ही ग्राहकांना सॅनिटायझर देऊ शकत नसल्याचे ठाण्यातील रॉयल केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

तसेच नागरिक मास्कचीही मागणी करीत आहेत; परंतु एन 95, तसेच चांगल्या दर्जाचे मास्कही आमच्याकडे शिल्लक राहिलेले नाहीत. साध्या मास्कचा केवळ काही साठा शिल्लक राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

समर्थ मेडिकलचे कर्मचारी म्हणाले, आमच्याकडे केवळ आता दोनशे बॉटल्याच शिल्लक राहिल्या आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सारखे हात धुण्याचा सल्ला दिला जात असल्याने नागरिकांकडून सॅनिटायझरची मागणी अचानक वाढली आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयातही याची मागणी होऊ लागल्याने आमच्याकडचा साठा कमी पडत आहे. कंपनीतून येणाऱ्या मालाचाही तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले. बालाजी जनरल स्टोअर्सचे विक्रेते म्हणाले, कळवा येथे 'सॅनिटायझर'च्या सैव्हलॉन कंपनीच्या छोट्या 9 मिलि बाटलीची किंमत 49 रुपये आहे. मोठी 20 मिलिची 100 रुपये आहे; तर एन-95 मास्कची किंमत 350 रुपये आहे. मात्र या दोन्ही वस्तूंची किंमत जास्त असल्याने व देशभरात सध्या मागणी वाढल्याने मागणी करूनही मिळत नसल्याने 'सॅनिटायझर' व मास्कही येथील 99 टक्के दुकानात सध्या उपलब्ध नाहीत. फक्त हिरव्या रंगाचे साधे मास्क उपलब्ध असून ते 30 ते 40 रुपयांना विकले जात आहेत. तसेच काही ठिकाणी उच्च दर्जाचे मास्क ब्लॅकने 150 ते 200 रुपयांना विकले जातात. 

"सॅनिटायझर' व एन-95 मास्क महाग असून ठेवायला परवडत नाहीत; तसेच मागणी करूनही उपलब्ध होत नाहीत.असे कळवा  येथील महालक्ष्मी मेडिकलचे मालक तानाजी हांडे म्हणाले.

तर कल्याण पूर्वसहित कल्याण-डोंबिवली शहरात एकूण अकराशे-बाराशे मेडिकल दुकाने असून या दुकानांमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कल्याण पश्‍चिममधील सरस्वती मेडिकल आणि जनरल स्टोअर्सचे मालक संतोष धनगर म्हणाले की, पूर्वी महिन्याला कसेबसे 3 सॅनिटायझर विक्री होत असत; तर कधी कधी माल पडून असायचा. मात्र या चार ते पाच दिवसांपासून 20 ते 30 ग्राहक येतात; मात्र मालच नाही तर कुठून देणार? 
 
मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत 
कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनय खटाव यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीमध्ये अकराशे ते बाराशेच्या आसपास मेडिकल स्टोअर्स असून सॅनिटायझरचा तुटवडा ही देशपातळीवराल समस्या निर्माण झाली आहे. याचा फायदा उचलण्यासाठी अन्य कंपन्या प्रयत्न करत असून अन्न व औषध विभागामार्फत आमचीही करडी नजर असून प्रमुख कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.  इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी; तसेच या तपासणीनंतर डॉक्‍टर वापरत असलेले सॅनिटायझरही बाजारात उपलब्ध नाहीत. ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात फार मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे आज बाजारपेठेत या उत्पादनांची कमतरता आहे. या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांशी संपर्क करून या वस्तू कमीत कमी वेळात बाजारपेठेत उपलब्ध होतील यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन प्रयत्नशील आहे. 

डोंबिवली आणि नजीकच्या परिसरात शालेय विद्यार्थी आणि नवजात बालकांना हाताळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. मात्र पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला आहे. येथे जय अंबे मेडिकल स्टोअरमध्ये दिवसाला 25 ते 30 सॅनिटायझर विकले जात आहेत. येथे दिवसाला 60 ते 70 सॅनिटायझरची मागणी असून दिवसेंदिवस ही मागणी वाढतच आहे. मात्र डोंबिवलीनजीकच्या ग्रामीण भागात हॅण्ड सॅनिटायझरबाबत लोकांना फारशी माहिती नसल्याने तेथील मेडिकलमध्ये पुरेसे सॅनिटायझर उपलब्ध आहेत. मुरबाडमध्ये मास्क व सॅनिटायझर शिल्लक नाहीत. लोक रोज हेलपाटे घालतात. आम्हाला डीलरकडून मिळत नाहीत. मुरबाड शहरात सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये हीच परिस्थिती आहे. 
- जयेश चव्हाण, मालक- बालाजी मेडिकल स्टोअर्स, मुरबाड. 

कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात हजारो रुग्ण दाखल होतात. आधीच रुग्णालयातील औषधाचे दुकान बंद असल्याने परिसरातील औषधांच्या दुकानावर येथील रुग्णाना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र या परिसरातील दुकानातही या दोन्ही वस्तू सध्या उपलब्ध नाहीत; त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानावर गर्दी होत आहे. कळवा परिसरातील जवळपास 90 टक्के औषधांच्या दुकानदारांनी मागणी करूनही मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा होत नाही. आम्ही संघटनेच्या वतीने शासनाकडे हे उपलब्ध व्हावे म्हणून मागणी करणार आहोत. 
- उत्तम पिसाट,अध्यक्ष 
कळवा मेडिकल असोसिएशन.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitizer crumbles in Thane district due to Corona collapse