Patangrao Kadam
पतंगराव कदम हे मराठी राजकारणी आणि काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४४ ला सोनसळ सांगली येथे झाला तर मृत्यू ९ मार्च २०१८ रोजी मुंबईत झाला. ते महाराष्ट्र राज्याचे माजी वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री आहेत. पतंगराव कदम यांच्या सोनसळ गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला .'रयत'च्याच हडपसर , पुणे येथील साधना विद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुण्यातील भारती विद्यापीठ संस्थेचे ते संस्थापक संचालक होते.