Poonam Mahajan
पुनम महाजन या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार असून भाजपचा तरुण चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाजन पहिल्यांदा महाराष्ट्रातील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणून आल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तरुण खासदार म्हणून त्यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या महाजन यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. म्हणूनच त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पुनम यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर राजकारणात प्रवेश केला. 2009 च्या विधासभेला त्यांनी घाटकोपर वेस्टमधून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना त्यात अपयश आले होते.