Vasantdada Patil
वसंतदादा पाटील महाराष्ट्रातील दिवंगत राजकारणी असून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते वसंतदादा पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी-असा त्यांचा जीवन प्रवास आहे. सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचे विधानसभेत आणि लोकसभेत प्रतिनिधित्व केले.