आर्थिक स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक
देश : स्थान
भूतान : 107
श्रीलंका : 112
बांगलादेश : 128
पाकिस्तान : 141
भारत : 143
मालदीव : 157
अफगाणिस्तान : 164

अर्थविषयक आणि शेअर बाजारातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : http://www.sakalmoney.com/

वॉशिंग्टन : आर्थिक स्वातंत्र्याबाबतच्या निर्देशांकात भारत पाकिस्तानसह अन्य शेजारी देशांपेक्षा पिछाडीवर असून, 143 व्या स्थानावर गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश पूर्णपणे मुक्त नसलेल्या गटात करण्यात आला आहे.

अमेरिकेतील हेरिटेज फाउंडेशनने 'आर्थिक स्वातंत्र्य अहवाल' जाहीर केला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताने मागील पाच वर्षांत विकास दर 7 टक्‍क्‍यांच्या जवळ कायम ठेवला असला तरी आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी धोरणे राबविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे भारताला आर्थिकदृष्ट्या मुक्त नसलेल्या गटात टाकण्यात आले आहे. याला बाजारपेठ अनुकूल धोरणात नसलेले सातत्य कारणीभूत ठरले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून सरकार गरजेपेक्षा जास्त अस्तित्व बाजारपेठेत दाखवून देत आहे. तसेच निर्बंध आणि कठोर नियामक वातावरण यामुळे स्वयंउद्योजकतेसोबत खासगी क्षेत्राच्या वाढीला प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी भारत 52.6 अंशासह आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 123 व्या स्थानी होता. या वर्षी यात 3.1 अंश घट होऊन भारत निर्देशांकात 143 व्या स्थानी आला आहे. निर्देशांकात हॉंगकॉंग, सिंगापूर, न्यूझिलंड अव्वल स्थानी आहेत. दक्षिण आशियातील अफगाणिस्तान (163) आणि मालदीव (157) हे निर्देशाकांत भारताच्या खाली आहेत. नेपाळ (125), श्रीलंका (112), पाकिस्तान (141), भूतान (107) आणि बांगलादेश (128) यांनी आर्थिक स्वातंत्र्यात भारताला मागे टाकले आहे.
अहवालात म्हटले आहे, की मोदी यांनी जून 2016 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यात द्वीपक्षीय संबंध आणि विशेषत: संरक्षण संबंध सक्षम केले. भारत हा जागतिक व्यापारातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, भ्रष्टाचार, अविकसित पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक संपत्तीचे कमकुवत व्यवस्थापन यामुळे सर्व विकासावर परिणाम होत आहे.

निर्देशांकात चीनला 57.4 अंशासह मिळाले असून, मागील वर्षीपेक्षा 5.4 अंशांची वाढ नोंदविण्यात आली आहे. निर्देशांकात चीन 111 व्या स्थानी असून, अमेरिका 71.1 अंशांसह 17 व्या स्थानी आहे. निर्देशांकात 49 देशांनी चांगली कामगिरी केली आहे. यात प्रामुख्याने विकसनशील देशांचा समावेश आहे.

Web Title: india lags behind in financial freedom