उद्योगनगरी विकासासाठी हवे निधीचे वंगण! 

-लुमाकांत नलवडे 
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

"उद्योगनगरी' अशी ओळख मिरवणाऱ्या शहराला महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. ना कामगारांचे हित जोपासले जाते, ना सुविधा पुरविल्या जातात. केवळ औद्योगिक वसाहतींचा विकास या "मथळ्या'खाली महापालिकेने अंदाजपत्रकात किमान दहा कोटी रुपयांची तरतूद करणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच किमान प्राथमिक गरजा पूर्ण होऊ शकतील. 

"उद्योगनगरी' अशी ओळख मिरवणाऱ्या शहराला महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. ना कामगारांचे हित जोपासले जाते, ना सुविधा पुरविल्या जातात. केवळ औद्योगिक वसाहतींचा विकास या "मथळ्या'खाली महापालिकेने अंदाजपत्रकात किमान दहा कोटी रुपयांची तरतूद करणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच किमान प्राथमिक गरजा पूर्ण होऊ शकतील. 

उद्योगनगरी म्हणून कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोचले आहे. "जेथे काहीच अशक्‍य नाही, ते म्हणजे "उद्यमनगर' अशी ओळख राज्यभर आहे. याच उद्योगनगरीला महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीसाठी वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. याच उद्योगनगरीने आजपर्यंत हजारो कामगारांच्या संसाराला हातभार लावला. स्क्रूपासून ते विमानाच्या सुट्या भागापर्यंतचे काम याच उद्योगनगरीतून पुढे आले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांच्या माध्यमातून आणि कारखानदार म्हादबा मेस्त्री, वाय. पी. पोवार यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींमुळेच आज शिवाजी उद्यमनगर वसलेले दिसून येते. ज्या उद्योगनगरीने सुमारे वीस हजारांहून अधिक कामागारांच्या हाताला काम दिले, महापालिकेच्या उत्पन्नात मोलाचा वाटा उचलला, त्याच उद्योगनगरीकडे अंदाजपत्रकात अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. "जेथे मतदान नाही तेथे निधी नाही' अशीच काहीशी अवस्था उद्योगनगरीची असल्याचे सांगण्यात येते. 
शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, संभाजीनगर परिसरातील टिंबर मार्केट, लोणार वसाहत, बापट कॅंप, लक्षतीर्थ, पांजरपोळ अशा ठिकाणी कोल्हापूर शहरातील उद्योगनगरी पसरली आहे. केवळ उद्यमनगर आणि वाय. पी. पोवार नगरातील कारखान्यांतून दहा हजारांहून अधिक कामगारांचे संसार चालतात. याच उद्योगनगरीत सुविधांची मात्र वानवा दिसून येते. येथे कामगारांसाठी महापालिकेने खास दवाखाना सुरू करणे गरजेचे आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवली पाहिजे. रस्ते चकाचक हवेत. कामगारांसाठी विसाव्याचे ठिकाण पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी कामगारांना अत्याधुनिक प्रशिक्षण देता येईल, जगभरातील बदल त्यांना दाखविणे शक्‍य होईल. 
शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर आणि पांजरपोळमध्ये परदेशातील उद्योजक येतात; मात्र येथील नागरी असुविधा पाहून आश्‍चर्य व्यक्त करतात. अनेकांनी एकदा आल्यानंतर पुन्हा येणे टाळल्याचा येथील उद्योजकांचा अनुभव आहे. जेथे जगभरातील उद्योगांचे सुटे भाग तयार होतात, त्या उद्योगनगरीत प्राथमिक सुविधाही नसल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटते; मात्र ही वस्तुस्थिती आहे. पर्यायाने उद्योगनगरीच्या नावाचे, कोल्हापूरचे आणि देशाचे नाव बदनाम होत असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येते. सध्या महापालिकेकडून उद्योगनगरी विकसनासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. किमान दहा-पंधरा कोटींची तरतूद करून प्रादेशिक विकास आराखडा तयार झाला पाहिजे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुविधा करणे शक्‍य होईल. 

या आहेत अपेक्षा... 
कामगारांसाठी मोफत सुलभ शौचालय 
चांगले रस्ते, गटर 
अल्प विश्रांतीसाठी छोटा बगीचा 
प्राथमिक आरोग्य केंद्र 
प्रशिक्षण केंद्र 

उद्योगनगरींची ठिकाणे - 
शिवाजी उद्यमनगर 
वाय.पी. पोवारनगर 
पांजरपोळ 
टिंबर मार्केट 
लोणार वसाहत, लक्षतीर्थ 
जवाहरनगर, सुभाषनगर 

आकडेवारीत 
उद्योगनगरीत कामगार - 20 हजार 
विभागलेल्या उद्योगनगरीत कामगार - 10 हजार 
शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर कारखाने - 1400 
पांजरपोळात छोटे-मोठे कारखाने - 300-350 

Web Title: kolhapur industries