साईना, सिंधूचा मार्ग अधिक सोपा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : भारताच्या ऑलिंपिक रौप्य आणि ब्रॉंझपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल यांचा यंदाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील मार्ग अत्यंत सोपा असेल. दोघींनी आपली आगेकूच कायम राखल्यास त्यांची उपांत्य फेरीत लढत होऊ शकते.

नवी दिल्ली : भारताच्या ऑलिंपिक रौप्य आणि ब्रॉंझपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल यांचा यंदाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील मार्ग अत्यंत सोपा असेल. दोघींनी आपली आगेकूच कायम राखल्यास त्यांची उपांत्य फेरीत लढत होऊ शकते.

ऑल इंग्लंड स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन दोघींनी आशियाई सांघिक स्पर्धेतून माघार घेतली होती. ऑल इंग्लंड स्पर्धेसाठी मंगळावारी 'ड्रॉ' काढण्यात आला. त्यानुसार साईनाची सलामीला जपानची माजी विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी गाठ पडणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे या वेळी ओकुहारा साईना समोर आव्हान उभे करू शकेल याची शक्‍यता खूपच कमी आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून ती एकही आंतरराष्ट्रीय लढत खेळलेली नाही. 

सिंधू सलामीची लढत डेन्मार्कच्या मेट्टे पौल्सेन हिच्याशी खेळेल. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तैवानच्या तई त्झु यिंग हिच्याशी पडू शकते. हा अडथळाही सिंधूकडून पार पाडला गेल्यास उपांत्य फेरीत तिची गाठ साईना नेहवालशी पडू शकते. 

पुरुष विभागात भारताचे के. श्रीकांत, अजय जयराम आणि एफ. एस. प्रणॉय मुख्य फेरीत असले, तरी त्यांच्यासमोर खडतर ड्रॉ आहे. सौरभ आणि समीर वर्मा बंधूंना पात्रता फेरीतून सुरवात करावी लागेल. 

भारत उपांत्यपूर्व फेरीत 
आशियाई सांघिक स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. साईना आणि सिंधूच्या गैरहजेरीत त्यांनी 'ड' गटातील लढतीत सिंगापूरवर 4-1 अशी मात केली. या गटातून भारत आणि कोरिया संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

प्रकाश पदुकोण यांचा सन्मान 
यंदाच्या ऑल इंग्लंड स्पर्धेसाठी भारताच्या माजी विजेत्या प्रकाश पदुकोण यांना प्रमुख पाहुण्यांचा मान मिळाला आहे. स्पर्धेत 11 आणि 12 मार्च रोजी पदुकोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. पदुकोण यांनी 1980 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.

Web Title: Badminton Saina Nehwal P V Sindhu All England Badminton