...अन्यथा मुख्यमंत्र्यांना गाईची धार काढायला लावू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

म्हाकवे - राज्यातील शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपने सत्तेवर येताना संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते जाणीवपूर्वक विसरले आहेत. शिवसेना-भाजपच्या या बांडगुळांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तत्काळ घोषणा न केल्यास येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतिम लढा उभारणार आहे. मी शेतकरी आहे, गायीची धार काढू शकतो, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर गाय नेऊन धार काढायला लावू.

म्हाकवे - राज्यातील शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपने सत्तेवर येताना संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते जाणीवपूर्वक विसरले आहेत. शिवसेना-भाजपच्या या बांडगुळांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तत्काळ घोषणा न केल्यास येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतिम लढा उभारणार आहे. मी शेतकरी आहे, गायीची धार काढू शकतो, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर गाय नेऊन धार काढायला लावू. ते बसता येत नाही म्हटले तरी गाय टेबलावर उभी करू; पण धार काढून त्यांना शेतकरी असल्याचे सिद्ध करावे लागेलच, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी दिले. 

सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे बोरवडे आणि सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

श्री. मुंडे म्हणाले, ""तीन वर्षापूर्वी परदेशातून काळे धन परत आणणार, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार, असे "अच्छे दिन'चे आमिष दाखवत भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. मात्र या देशातील सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या कष्टाचे पैसे मिळणेही आज मुश्‍कील झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने देशाला समतेचा संदेश दिला असून कागलच्या मातीतून समतेची ज्योतही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारच्या ध्येय धोरणाविरुद्ध कागलच्या मातीतूनच परिवर्तनाची लाट निर्माण होणार आहे.'' नोटाबंदीच्या काळात काळे पैसेवाले कधीच रांगेत दिसले नाहीत. याउलट कष्टाने मिळवलेला पैसा स्वतःला पाहिजे म्हणून काढण्यासाठी सर्वसामान्यच रांगेत दिसले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यांपासून या राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र या समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. 

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ""गेली 35 वर्षे कागलमध्ये विशिष्ट घराण्याभोवती कागल पंचायत समितीची सत्ता आहे. कुणाची तरी मदत घ्यायची आणि सत्ता भोगायची, अशी ही घराणेशाही राष्ट्रवादी या निवडणुकीत मोडून काढेल.'' 

प्रताप माने, मनोज फराकटे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. इंद्रजित पाटील यांनी स्वागत तर शिवानंद माळी यांनी प्रास्ताविक केले. ए. वाय. पाटील, राजू लाटकर, नाविद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, दिनकर कोतेकर, जयदीप पवार, अंजना सुतार, प्रकाश गाडेकर, नितीन दिंडे, डी. एम. चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. 

"सेवा' मुश्रीफांकडून शिकावी 
धनंजय मुंडे म्हणाले, ""सामान्य माणसांची सेवा आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून शिकावी. राज्यभर मी त्यांचे उदाहरण देऊन सांगतोय. कारण ज्या तालुक्‍यात त्यांच्या विरोधकांना स्वतःच्या वारसाशिवाय राजकारणात दिसत नाही, अशा ठिकाणी मुश्रीफांनी नगरपालिकेतील स्वतःच्या नात्यातल्या उमेदवाराला पाडून नेता आणि कार्यकर्ता यांच्यातले नाते किती घट्ट असते, हे दाखवून दिले आहे.''

Web Title: dhanjay mundhe