गड्या आपला गावच बरा

डॉ. मनीषा तावरे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येकाचेच अस्तित्व असते आणि म्हणूनच निवृत्तीनंतरचे जीवन सुखकारक तेव्हाच होते जेव्हा स्वतःच्याच मस्तीत घालवलेल्या भूतकाळातील आठवणींमध्येच ही ज्येष्ठ मंडळी रमतात आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी मनात ही भावना कायम असते... "गड्या... आपला गावच बरा..."
डॉ. मनीषा तावरे

जे. कृष्णमूर्ती नावाचे तत्त्वचिंतक सांगत असत, की आल्या क्षणाची निर्मलता सांभाळून जगा. त्यात भूत, भविष्य भरू नका. त्या त्या क्षणांचे निर्लेप व स्वतंत्र अस्तित्व हाच मौलिक जीवन घटक माना; पण आपण नेमके याच्या उलट वागतो.

परवाच माझे परिचित असणारे एक काका भेटले आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने विषय वाढवला. निवृत्तीनंतरच्या जीवनावर विषय येताच काका शांत झाले. काकांना दोन्ही मुलगेच. एक अमेरिकेत आणि दुसरा बंगळूरला. ही आजीआजोबांची जोडी कधी इकडे, तर कधी तिकडे राहत. थोडा कालावधी लोटला की ते अस्वस्थ होत आणि त्यांना आपली हयात घालवलेल्या गावाची आठवण येते. मुलं, सुना, नातवंडे त्यांच्या कामात व्यस्त असतात. एक दिवस सुटी मिळाली की ती त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेतात; पण अनोळखी शहरात, परदेशात आपल्यासारख्या वृद्धांना कोणी मित्र नाही की फिरण्याची सोय नाही. परिणामी दुखण्यांची संख्या वाढतच चालली आहे. वृद्धावस्थेतील बालपण अनुभवायला कोणाला वेळच नाही. काका निराश झाले आहेत. खरंच किती वास्तव परिस्थिती आहे ही. आपल्या गावात कमी बोलून, कमी वेळा भेटूनही गाढ स्नेह टिकून राहतो. न भेटता, न बोलताही मने सांभाळली जातात ही जाणीवही मनाला उभारी देणारी असते. डोळ्यांदेखत होणारा जीवनाचा ऱ्हास थांबवणे आणि विधायक सवयींनी विकसित होणे सहजच शक्‍य आहे. थोडी जाण, थोडा प्रयत्न, थोडी सद्‌भावना एवढ्या अल्प भांडवलावर जीवनयात्रा पूर्ण करून मोक्षाची पंढरी गाठता येईल.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना शिकविण्याचा ध्यास घेतलेल्या एका शिक्षिकेची व्यथा तर याहूनही भयानक. मुलगा लहान असतानाच पतीचे छत्र हरवलेल्या बाईंनी रात्रीचा दिवस करून मुलाला वाढवले. सर्वसामान्य माणसांसारखे साधेसरळ स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मुलगा शिकेल, स्वतःच्या पायावर उभा राहील आणि आपले पांग फेडेल; पण झाले नेमके उलटे. मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. त्याचे लग्न झाले आणि लेक सुनेने मिळून बाईंना घराबाहेर काढले. बाई कोणालाही न सांगता वृद्धाश्रमात गेल्या. निवृत्तीनंतर पेन्शनचा आधार असल्यामुळे चिंता नव्हती; पण जेव्हा मुलाला आईचा तपास लागला तेव्हा फक्त पैशासाठी वृद्धाश्रमाची वारी करू लागला. कसली ही अगतिकता म्हणायची?

सामाजिक भान गहाण टाकलेली अशी मुले आणि निवृत्तीनंतरचा सर्व पैसा मुलांच्या हवाली करून पराधीनतेचे जीवन जगणारी अशी ज्येष्ठ मंडळी आपल्याला पावलोपावली भेटतात. मन सुन्न करणाऱ्या अशा घटना अनुभवल्या, की अनुत्तरित प्रश्नांची मनात नुसतीच गर्दी होते. आज वृद्धाश्रमात राहणारी "ती' माउली स्वतःच्या गावात, स्वतःच्या घरात येण्यासाठी केवळ त्याच क्षणांसाठी जगते आहे. मंडळी अशी वेळ जर येऊ द्यायची नसेल, तर माणसांना वेळीच समजायला हवे की आपल्याला नेमके काय हवे आहे? जगण्याच्या धडपडीत जगणे म्हणजे काय याचाच विचार करण्याची वेळ आली आहे. अशीच जर माणुसकी हरवत गेली तर एखाद्या झोपडीत एखादी बहिणाबाई जात्यावर गात असेल "माणसा माणसा, कधी होशील माणूस'?

व्यक्तींना घडणारा परस्परांचा प्रत्यक्ष सहवास दुर्मिळ झाला आहे आणि वस्तूंच्या नावीन्याचे आकर्षण इतके वाढले आहे, की त्यासाठी जिवाचा जोहार करण्याची तयारी आहे. या सर्व परिवर्तन सोहळ्यात काही गोष्टी विस्मरणात जात आहेत. प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येकाचेच अस्तित्व असते आणि म्हणूनच निवृत्तीनंतरचे जीवन सुखकारक तेव्हाच होते, जेव्हा स्वतःच्याच मस्तीत घालवलेल्या भूतकाळातील आठवणींमध्येच ही ज्येष्ठ मंडळी रमतात आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी मनात ही भावना कायम असते... "गड्या...आपला गावच बरा...!"

इतर ब्लॉग्स