स्वत:ला मत देऊनही उमेदवाराला शून्य मत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

टेकाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथे ९ सदस्य व सरपंच अशा १० सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या सरपंचासह ६ सदस्य भाजपने जिंकून आणून कमळ फुलविले. परंतु काँग्रेस पक्षाने आपल्या तीन जागा राखत एका जागेसाठी कोर्टाच्या पायरीवर पाय ठेवला आहे. जुनी कामठी येथील काँग्रेस पक्षाच्या समर्थित पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार प्रफुल्ल कावळे व त्यांच्या समर्थकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. त्यांना स्वतःचेही मत मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे.

प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती सदस्यपदाचे उमेदवार दीपक महादेव कोथरे यांना चक्क शून्य मते मिळालीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे कोथरे यांनी स्वत:ला मतदान केले, त्यांच्या कुटुंबीयांनी व समर्थकांनीही कोथरे यांना मत दिले. तरी मतदान शून्य आल्याने एव्हीएमबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणी प्रभागातील सरपंचपदाचे उमेदवार प्रफुल्ल कावळे, दीपक कोथरे, सुनीता खंते व ज्योती मेंढे यांनी ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ईव्हीएम मशीनचा घोळ उघड करण्याचे ठरविले आहे.

कोथरे हे ग्रामपंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथून प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढत होते. याच प्रभागातील त्यांचे प्रतिद्वंद्वी राहुल गोपीचंद ढोके यांना ३०३ मतांपैकी १३१ मते मिळाल्याने ते विजयी झाले. एकूण ३०३ मते असलेल्या प्रभागात १७२ मते ही नोटावर गेलीत. ज्यात कोथरे यांच्या पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार कावळे यांना १६२ मते मिळाली. तेव्हा कोथरे यांचे स्वतःचे, ज्या पॅनेलसोबत ते निवडणुकीत उभे होते त्यांचे व कुटुंबीयांचे मत नेमके गेले कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ईव्हीएम घोळामुळे कोथरेंच्या चिन्हाची बटण दाबले तर मते मात्र नोटाला गेली असल्याचे तर्कदेखील लावण्यात येत आहेत. दरम्यान, निवडणुकांमध्ये झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे लागलेला एकतर्फी निकाल हा सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. निवडणूक आयोगाला प्रभाग ३ मध्ये सरपंचासह ३ सदस्य अशा ४ जागांसाठी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस पक्ष जुनी कामठीतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: tekadi vidarbha news evm machine scam