जलवाहतुकीला सरकारचे प्राधान्य 

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई  - मुंबईसह ठाणे आणि लगतच्या शहरातील रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्याच्या पार्श्‍वभूमीवर एमएमआर क्षेत्रात जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे केंद्र सरकारच्या "नॅशनल वॉटर वे ऍक्‍ट 2016' मध्ये एमएमआर क्षेत्रातील सात खाडी मार्गांचा समावेश झाला आहे. त्यामुळे वर्षभरात कल्याणपासून वसई-विरार आणि मिरा-भाईंदरपर्यंत जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. 

ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरारपासून कल्याण आणि त्यापुढे एमएमआरडीए क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर सरकारने भर दिला आहे. सध्याची रस्ते वाहतूक व्यवस्था अत्यंत तोकडी असल्याने एमएमआर क्षेत्रातील खाड्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी दोन वर्षांपासून सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे "द नॅशनल वॉटर वे ऍक्‍ट 2016' मध्ये महाराष्ट्रातील 14 मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी सात मार्ग विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये असून, उर्वरित सात मार्गांचा खाडीत समावेश झाला आहे. 

जलवाहतुकीमुळे कल्याण, वसई, मिरा-भाईंदर, घोडबंदर, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे येथे जेटी बांधून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. 

दरम्यान, नाशिकहून गुजरातला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक कशेळी ते घोडबंदरदरम्यान जलमार्गाने करता येईल का, याचा अभ्यास सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

रो रो सेवा 
गोराई ते बोरिवली आणि वसई ते भाईंदर या मार्गावर रो रो वाहतूक प्रस्तावित आहे. त्यास केंद्राच्या सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे. या सेवेसाठी आवश्‍यक पर्यावरण विभागाच्या परवानग्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तो मिळाल्यानंतर रो रो सुरू करण्यात येईल.

Web Title: maharashtra news National Water Way Priority of navigational government