'युतीच्या निर्णयावर ठाम'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

भिवंडी - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीच्या लढती झाल्या असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेबरोबर युतीसाठी तयारी दर्शवली आहे. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटील यांनी भाजप युतीसाठी तयार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. भाजपने युतीसाठी हात पुढे केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक १३ डिसेंबर ही जाहीर केल्यानंतर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजप आणि शिवसेना तुल्यबळ आहेत. बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये भाजप, शिवसेनेचे वर्चस्व असल्याने जिल्हा परिषद निवडणुका युती करून लढवल्या गेल्या, तर शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. शहापूर आणि मुरबाड वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे अस्तित्व नसल्याने भाजप-शिवसेनेलाच सत्ता मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, त्यांनी शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपची तयारी असल्याचे स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याचे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना एकत्र आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही शिवसेनेबरोबर एकत्र काम करण्याची भाजपची तयारी आहे. त्या दृष्टीने आम्ही युतीचा प्रस्ताव दिला आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबतीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच संपर्क करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची गट-गणांची रचना सुरू झाल्यानंतर, लगेचच भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी भाजपची युतीसाठी तयारी असल्याचे जाहीर केले होते. त्या वेळी शिवसेनेने सावध भूमिका घेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा खासदार कपिल पाटील यांनी युतीची तयारी दर्शविल्यावर शिवसेनेच्या कोर्टात युतीचा चेंडू गेला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिवसेनेबरोबर युतीने लढवण्याची भाजपची तयारी आहे.
- कपिल पाटील, खासदार,  ठाणे विभागीय अध्यक्ष, भाजप

जिल्हा परिषदेतील युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जाईल,
- प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: Bhiwandi news politics shiv sena bjp