रत्नागिरीतील ३४ गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मंडणगड - देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन डॉक्‍टर नियुक्त आहेत; मात्र हे दोन्ही डॉक्‍टर गेल्या तीन-चार वर्षांपासून रजेवर आहेत. पर्यायी प्रभारी वैद्यकीय अधिकारी तीन दिवसांपूर्वी अधिकृत रजेवर गेले असून आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे परिसरातील ३४ गावांतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मंडणगड - देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन डॉक्‍टर नियुक्त आहेत; मात्र हे दोन्ही डॉक्‍टर गेल्या तीन-चार वर्षांपासून रजेवर आहेत. पर्यायी प्रभारी वैद्यकीय अधिकारी तीन दिवसांपूर्वी अधिकृत रजेवर गेले असून आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे परिसरातील ३४ गावांतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नाईलाजास्तव रुग्णांना वीस ते पंचवीस किलोमीटर लांब शहरातील ग्रामीण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड गरिबांना परवडणारा नाही. 

डॉक्‍टरांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉ. इनामदार व डॉ. शेळके या दोन डॉक्‍टरांची नियुक्ती आहे; मात्र हे दोन्ही डॉक्‍टर तीन-चार वर्षे रजेवर आहेत. त्यांच्या जागी कुंबळे आरोग्य केंद्रात सेवेत असलेले डॉ. पुंगळे हे सध्या देव्हारे आरोग्य केंद्राचे काम पाहत आहेत. डॉ. पुंगळे हे चार दिवसांपासून रजेवर आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांना सेवा देण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चरके एक दिवसाआड येतात. डॉ. चरके यांच्याकडे पणदेरी आरोग्य केंद्राचीही जबाबदारी आहे. त्यामुळे देव्हारे परिसरातील रुग्णांना सेवेचा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत.

सध्या शेतीची कामे सुरू असून रात्री विंचू किंवा सापाचा दंश झाल्यास किंवा इतर कोणताही आजार उद्‌भवल्यास देव्हारे परिसरातील ग्रामस्थांना उपचारासाठी मंडणगड येथे जावे लागते. प्रसंगी ते जिवावर बेतते. ग्रामीण भागातील जनतेला होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देणे आवश्‍यक असताना त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. रुग्णालयात एकच डॉक्‍टर कार्यरत असल्याने वेळोवेळी होणारे कॅम्प किंवा रत्नागिरी येथे होणाऱ्या सभेसाठी ते गेल्यास येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होतात. पर्यायाने लोक खासगी डॉक्‍टरांकडे जातात. ही रुग्णसेवा अत्यंत महागडी असते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याची दखल घेऊन येथे लवकरच डॉक्‍टरांची रिक्त जागा भरावी, अशी मागणी आहे.

देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निवासी डॉक्‍टर नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. उपचार मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडल्यासारखे आहे. 
- शशिकांत म्हाब्दी, वडवली ग्रामस्थ

अत्यावश्‍यक प्रसंगी प्राथमिक उपचार उपलब्ध होत नसून त्यासाठी मंडणगड, दापोली या ठिकाणी जावे लागते. ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची सुविधाही वेळेत उपलब्ध होत नाही.
- तुषार करावडे,
आतले ग्रामस्थ

११ पदे रिक्त 
देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण ४० पदे मंजूर असून ११ पदे रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी २, आरोग्य सेवक पुरुष ४, महिला २, पुरुष परिचर १, अंशकालीन स्त्री परिचर २ या पदांचा समावेश आहे.

Web Title: Ratnagiri News Health facility unavailable in 34 villages