इतिहासाकडून परिहासाकडे! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कहांसो रतनसेन अब राजा?। कहां सुआ अस बुधि उपराजा?। 
कहां अलाउदिन सुलतानू?। कहां राघव जेइ किन्ह बिखानू?। 
कहां सुरुप पद्मावती रानी। कोइ न रहा, जग रही कहानी। 

खरे तर चित्रपटातील इष्ट-अनिष्ट बाबींची दखल घेऊन त्यावर कायदेशीर कात्री चालविण्याचे अधिकार सेन्सॉर बोर्डाकडे असतात; परंतु आपल्याकडे अलीकडच्या काळात सरकारबाह्य सेन्सॉरशिप शिरजोर होताना दिसते आहे. 

सूफी कविश्रेष्ठ मलिक महम्मद जयासी यांनी 1540मध्ये अवधी भाषेत लिहिलेल्या "पद्‌मावत' या खंडकाव्यात चितोडगडच्या जोहाराचा आणि राणी पद्मावतीचा पहिल्यांदा उल्लेख झाला. राणी पद्मावती ही कविकल्पनेतून साकारलेली धगधगीत व्यक्‍तिरेखा आहे की खराखुरा इतिहास, हा संशोधकांमध्ये वादचर्चेचा विषय असला, तरी ते राजपूत इतिहासाचे तेजस्वी पान मानले जाते. "मूहम्मद कबी यहि जोरि सुनावा। सुना सो पीर प्रेम कर पावा।'..चितोडगडची ही मूहम्मद कवीने सांगितलेली कहाणी ऐकून साधुसंतही प्रेमात पडतील, अशी अपेक्षा जयासी यांनी व्यक्‍त केली होती. प्रत्यक्षात तब्बल साडेचारशे वर्षांनंतर ही कहाणी प्रेमाला नव्हे, तर विखारालाच कारणीभूत ठरताना दिसते, हा दैवदुर्विलासच.

आजमितीस राणी पद्मावती ही राजपूत अस्मिता आणि पर्यायाने भारतीय स्त्रियांच्या कणखरपणाचेही एक प्रतीक बनली आहे. एखाद्या ऐतिहासिक व्यक्‍तिरेखेचे श्रद्धास्थानात रूपांतर झाले की तेथे तर्काबिर्काची कसोटी लावणे निरर्थक ठरते. सामाजिक आरोग्यासाठी असल्या तर्काचे औषध कुपथ्यकारक ठरते. म्हणूनच महंमद जयासीच्या खंडकाव्यावर आधारित आगामी "पद्मावती' या महाचित्रपटाच्या वितरणापूर्वीच देशभर राजकारणाचा वणवा पेटलेला दिसतो, तो निरर्थक आणि इतिहासाचा परिहास वाटावा असाच आहे. "पद्मावती' हा महाचित्रपट तब्बल 180 कोटी रुपये खर्चून तयार झाला असून, जगभर तब्बल आठ हजार पडद्यांवर दाखविण्याचा निर्मात्यांचा बेत आहे. परंतु राजकीय कारणांमुळे चित्रपटाच्या भवितव्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असून, ही बाब कलाक्षेत्रासाठी निश्‍चितच आश्‍वासक मानता येणार नाही. 

एखाद्या चित्रपटीय कलाकृतीमुळे राजकारणाचा आखाडा तयार होणे, हे तसे नवीन नाही. हा प्रकार जगभर चालतो. तीन वर्षांपूर्वी, इराणचे विख्यात दिग्दर्शक मजिद मजिदी यांनी निर्मिलेल्या "मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाबद्दलही असेच जगभर वादळ उठले होते. अनेक देशांनी हा चित्रपट प्रदर्शितदेखील होऊ दिला नाही. विख्यात चित्रनिर्माते अकिरा कुरासावा यांनी "इतिहासाच्याही आवृत्त्या निघत असतात. त्याची दखल कलाविश्‍वानेच घ्यायची असते,' अशी टिप्पणी केली होती. भारतातील सांस्कृतिकतेच्या नियमशर्ती अधिक गुंतागुंतीच्या असतात, हे कुरासावांना माहीत नसावे! निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी "पद्मावती'च्या कथानकाला हात घातल्यानंतर हे नाजूक प्रकरण ते कसे हाताळणार, अशी चिकित्सा काही ठिकाणी झालीच होती. त्याप्रमाणे घडलेही! राजस्थानातील "करनी सेना' या संघटनेने प्रारंभापासून "पद्मावती'च्या निर्मितीतच खोडा घालण्याचा चंग बांधला. हा निव्वळ खंडणीखोरांचा कांगावा असल्याची वृत्तेही पाठोपाठ आली. परंतु आता तर "करनी सेने'सोबत राजस्थानातील राजघराण्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या राजपुरोहितांपर्यंत अनेकांनी चित्रपट प्रदर्शित होण्याला कडवा विरोध आरंभला आहे. पुढील वर्षी राजस्थानात विधानसभा निवडणुकीचे ढोल-नगारे वाजणार आहेत, त्याचीच ही रंगीत तालीम मानावी काय? वास्तविक हा संपूर्ण वाद निरर्थक, किंबहुना अनर्थकारी आहे.

साडेचारशे वर्षे जी काव्यकथा शिरोधार्य मानली गेली, त्यावर आधारित चित्रपटाला विरोध कसा? हीच बाब अनाकलनीय वाटते. भन्साळी यांच्या आधीच्या "बाजीराव-मस्तानी' चित्रपटाच्या वेळीही असाच काहीसा वादंग माजला होता. परंतु या वेळी खुद्द भन्साळी यांनी "आपल्या चित्रपटात अलाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीचे कुठलेही स्वप्नदृश्‍य नाही. हा एक जबाबदारीने आणि कमालीच्या प्रामाणिकपणाने केलेला कलात्मक प्रयत्न असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यावर विश्‍वास ठेवून प्रदर्शनापर्यंत थांबणे, सयुक्‍तिक ठरले असते. खरे तर चित्रपटातील इष्ट-अनिष्ट बाबींची दखल घेऊन त्यावर कायदेशीर कात्री चालवण्याचे अधिकार सेन्सॉर बोर्डाकडे असतात आणि भन्साळींचा हा महाचित्रपट अजून सेन्सॉर बोर्डाकडे मंजुरीलादेखील पोचलेला नाही. आपल्या देशात सरकारबाह्य सेन्सॉरशिप कशी शिरजोर होत जाते, त्याचेच हे ज्वलंत उदाहरण! या वर्तनातून संबंधितांचा राजकीय फायदा काय व्हायचा तो होवो किंवा न होवो; पण कला आणि सांस्कृतिक क्षेत्राची मात्र अपरिमित हानी होत असते, हे एक विदारक सत्य आहे. 

कहांसो रतनसेन अब राजा?। कहां सुआ अस बुधि उपराजा?। 
कहां अलाउदिन सुलतानू?। कहां राघव जेइ किन्ह बिखानू?। 
कहां सुरुप पद्मावती रानी। कोइ न रहा, जग रही कहानी। 

..."पद्मावत' या खंडकाव्याच्या उपसंहारात कवी जयासी याने टाकलेल्या या काव्यमय उसाश्‍याचे रूपांतर आगीच्या लोळात होताना पाहणे क्‍लेशकारक आहे. 

Web Title: editorial article padmavati movie