पिंपरी चिंचवड: अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फुगेवाडीकर रस्त्यावर 

मिलिंद संधान
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मागील कित्येक दिवसांपासून फुगेवाडी गावठाण, ओकांर चौक, संजयनगर, आझाद चौक येथे पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवकांपासून ते महापालिका प्रशासनाला तक्रारी दिल्या होत्या. परंतु तक्रार केल्यानंतर काही काळापुरते पाणी पुरवठा सुरळीत व्हायचा व नंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या... ' हाच प्रकार चालु राहिल्याने आज नागरिकांच्या सयंमाचा बांध तुटला आणि पहाटे सहा वाजल्यापासूनच त्यांनी पुणे मुंबई हायवेवर गर्दी करायला सुरूवात केली. 

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वैतागलेल्या फुगेवाडीतील नागरिकांनी मेघामार्ट येथील दापोडी फुगेवाडी जंक्शन चौकात आज रास्ता रोको केला. त्यामुळे पुणे मुंबई रस्ता सकाळी सात वाजल्यापासून जाम झाल्याने येथे काही काळासाठी वाहतुक कोंडी झाली होती. परंतु भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला विश्वासात घेतल्यानंतर वाहतुक पुन्हा सुरळीत झाली. 

मागील कित्येक दिवसांपासून फुगेवाडी गावठाण, ओकांर चौक, संजयनगर, आझाद चौक येथे पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवकांपासून ते महापालिका प्रशासनाला तक्रारी दिल्या होत्या. परंतु तक्रार केल्यानंतर काही काळापुरते पाणी पुरवठा सुरळीत व्हायचा व नंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या... ' हाच प्रकार चालु राहिल्याने आज नागरिकांच्या सयंमाचा बांध तुटला आणि पहाटे सहा वाजल्यापासूनच त्यांनी पुणे मुंबई हायवेवर गर्दी करायला सुरूवात केली. 

यावेळी नगरसेविका माई काटे, आशा शेंडगे, नगरसेवक रोहित काटे, राजु बनसोडे देखील घटनास्थळी हजर झाले. यावेळी नगरसेविका काटे व शेंडगे यांनी महापौर नितिन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर यांच्याशी फोन वरून चर्चा करून घटनेचे गांभीर्य सांगितले. दरम्यान लोकांची गर्दीही वाढत गेली व नगरसेविका काटे, नगरसेवक बनसोडे यांनीही लोकांबरोबर पाण्याचा हंडा उलटा करून रस्त्यावर बैठक ठोकली. सकाळी येथे वाहतुक कोंडी झाली होती. सहायक आयुक्त रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता ( पाणी पुरवठा ) रामदास तांबे यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.

कार्यकारी अभियंता रामदास तांबे म्हणाले, "गुरूवारी (ता. ९) रोजी पुर्वनियोजित पाणी पुरवठा बंद होता. त्यात फुगेवाडीला कासारवाडीहून येणारी जलवाहिनीत बिघाड झाला होता. नाशिक फाट्याजवळील वॉल दुरूस्त केल्यानंतर आज दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत फुगेवाडीला जास्तीचा पाणी पुरवठा केला. भविष्यात येथे कायमस्वरूपी उपाय योजना करून हा प्रश्न कायमचा निकालात निघेल." 
 
Web Title: esakal marathi news pimpri chinchwad Fugewadi water issue