परप्रांतीय गु-हाळ चालकांचा पुण्यात शेतक-यांना गंडा

रमेश वत्रे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पोबारा केलेले गु-हाळ चालक गेल्या दोन ते तीन वर्षापासून पारगाव परिसरात गु-हाळ चालवत होते. शेतक-यांशी गोड बोलून त्यांच्या विश्वास संपादन केला. गेल्या दिवाळीपासून त्यांनी 2800 रूपये अशा चढया दराने ऊस खरेदी केला. यातील अनेक शेतक-यांनी 15 दिवसांच्या उधारीवर गु-हाळांना ऊस दिलेला आहे. काही शेतक-यांना पुढील तारखेचे धनादेश दिले आहेत.

केडगाव : पारगाव ( ता.दौंड, जि.पुणे ) येथील तीन परप्रांतीय गु-हाळ चालकांनी पोबारा केल्याने शेतक-यांचे धाबे दणाणले आहेत. या तीन गु-हाळांना शेतक-यांनी एक कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा ऊस दिला आहे.

इब्राहिम फरेदी ( वय 30 ), राशिद फरेदी ( वय 28 ), परवेझ गौर ( वय 45 तिघेही रा. रूडकी उत्तराखंड. ) यांनी पोबारा केला आहे. पारगाव येथील प्रदीप पंढरीनाथ भाडळे, अशोक ज्ञानदेव भाडळे, तुकाराम राजाराम ताकवणे यांच्या जागेत ही गु-हाळे चालू होती. जादा दराच्या अमीषाला बळी पडल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यात यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत मात्र गु-हाळ चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. गु-हाळे चालू करताना मालक व चालकांवर कोणतेही सरकारी नियंत्रण नसते. ते मोकाट राहिल्याने या व्यवहारात शेतकरी भरडले जात आहेत. 

पोबारा केलेले गु-हाळ चालक गेल्या दोन ते तीन वर्षापासून पारगाव परिसरात गु-हाळ चालवत होते. शेतक-यांशी गोड बोलून त्यांच्या विश्वास संपादन केला. गेल्या दिवाळीपासून त्यांनी 2800 रूपये अशा चढया दराने ऊस खरेदी केला. यातील अनेक शेतक-यांनी 15 दिवसांच्या उधारीवर गु-हाळांना ऊस दिलेला आहे. काही शेतक-यांना पुढील तारखेचे धनादेश दिले आहेत. 

गु-हाळ चालकांनी व्यापा-यांना ऊस दिल्यानंतर त्यांना त्याचे लगेच रोख किंवा धनादेशाने पैसे मिळतात. मात्र गु-हाळ चालक शेतक-यांना 15 दिवसांनी पैसे देत होते. अनेक शेतक-यांना थोडे थोडे पैसे देऊन अडकवून ठेवले होते. पैशांना उशीर होऊ लागल्याने काही शेतक-यांनी पैशासाठी तगादा लावला होता. तगादा वाढल्याने तीनही गु-हाळ चालक जण एका रात्रीत पळून गेले आहेत. 

गुळाचे दर खाली आले आहेत. कारखाने आता सुरू झाले आहेत. त्यामुळे जादा दर देणे गु-हाळांना शक्य नाही. यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेक गु-हाळ चालक पळून जाण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा शेतक-यांनी सावध राहिले पाहिजे. शेतक-यांनी गु-हाळांऎवजी साखर कारखान्यांना ऊस घालावा असे पारगाव येथील ज्येष्ठ शेतकरी सोपानराव शेलार यांनी सकाळशी बोलताना सांगितले.  

पोलिसात तक्रार करणे अवघड

विश्वासावर ऊस घातल्याने शेतक-यांकडे ऊस घातल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार करणेही अवघड झाले आहे. काही जागा मालकच ऊस खरेदी करून तो गु-हाळांना देत होते. त्यामुळे शेतकरी आता गु-हाळ जागा मालकांकडे चकरा मारत आहेत. गु-हाळांच्या परवानग्या बंधनकारक करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहे

Web Title: Marathi news Pune news farmers cheated by thugs sugarcane jaggery