मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे दंगलीचे सूत्रधार: प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा येथे सोमवारी कोणताही प्रकार घडला नाही. पण, वढू बुद्रुक येथून जवळ असलेल्या सणसवाडी येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. मनोहर भिडे यांच्या शिवराज प्रतिष्ठाण आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीतर्फे हे सर्व घडवून आणण्यात आले. स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करावी लागली. गाड्या जाळायला लावल्या. सरकारने याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी. पोलिसांना मदत करून सर्वांनी शांतता राखावी.

मुंबई : कोरेगाव भीमाच्या अलिकडे असलेल्या सणसवाडी येथे झालेल्या दंगलीचे मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि घुगे हे सूत्रधार असून, त्यांच्याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की कोरेगाव भीमा येथे सोमवारी कोणताही प्रकार घडला नाही. पण, वढू बुद्रुक येथून जवळ असलेल्या सणसवाडी येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. मनोहर भिडे यांच्या शिवराज प्रतिष्ठाण आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीतर्फे हे सर्व घडवून आणण्यात आले. स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करावी लागली. गाड्या जाळायला लावल्या. सरकारने याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी. पोलिसांना मदत करून सर्वांनी शांतता राखावी. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, की कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पोलिसांनी हलगर्जीपणा केला. आम्ही पोलिस अधीक्षकांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो. पण, त्यांचा फोन लागत नव्हता. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे आम्ही उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदचे आवाहन करत आहोत. नागरिकांनी शांततेत बंद पाळावा. कोणत्याही संघटनेला आम्ही आव्हान देत नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही संघटनेने प्रतिआव्हान देऊ नये.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झालेला असताना विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले आणि घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

Web Title: Marathi news Maharashtra news Prakash Ambedkar statement on bhima koregaon