भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप दलितविरोधी असल्याचे उदाहरण : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

''भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप आणि संघ दलितविरोधी असल्याचे उदाहरण आहे''

(राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष )

नवी दिल्ली : राज्यभरात भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून तणाव वाढत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. ''भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप आणि संघ दलितविरोधी असल्याचे उदाहरण आहे'', अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसेच या सर्व हिंसाचाराला भाजप आणि संघ जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर राज्यभरात परिस्थिती चिघळत आहे. त्यावर राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजे, असा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य आधार आहे. तसेच उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीनही घटना याबाबतची स्पष्ट उदाहरणे आहेत. या सर्व बाबींवरून संघ आणि भाजपच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाले'', अशी टीका राहुल गांधींनी केली.  

दरम्यान, कोरेगाव भीमा येथे सोमवारी कोणताही प्रकार घडला नाही. मात्र, वढू बुद्रुकजवळील सणसवाडी येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. मनोहर भिडे यांच्या शिवराज प्रतिष्ठाण आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीतर्फे हे सर्व घडवून आणण्यात आले, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

  

Web Title: marathi news national news Bhima Koregaon Is Potent Symbol Of RSS BJP