टीएमटी टाकतेय कात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

ठाणे - महापालिकेच्या परिवहन सेवेने आता खऱ्या अर्थाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बस थांब्यांवर आता एलईडी टीव्ही लावले जाणार असून, या एलईडी स्क्रीनवर बस थांब्यांवर उपस्थित प्रवाशांना त्यांची बस नक्की किती वेळात थांब्यावर येणार, याची माहिती मिळणार आहे. या माहितीनुसार प्रवाशांना ताटकळत राहावे लागणार नसून त्यांची बस काही कारणामुळे उशिरा येत असेल, तर त्यांना पर्यायी वाहनाचा पर्याय निवडण्याचा अवधी मिळणार आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणाभिमुख बस निवारे अभिव्यक्ती स्वारस्य अर्थात खासगी लोकसहभागातून उभारण्याचा निर्णय सुमारे दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. यामध्ये प्रवाशांना बस थांब्यावरच एटीएम, हेल्पलाईन, सीसी टीव्ही, मोबाईल चार्जिंग आदी सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापैकी अनेक घोषणा अद्याप टीएमटी प्रशासनाच्या कागदावरच आहेत; पण त्याचवेळी काही योजनांचा मार्ग आता मोकळा होत आहे. सुमारे 130 बस थांब्यावर सुरुवातीच्या टप्प्यात एलईडी स्क्रीन लावली जाणार आहे. या महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती टीएमटीमधील सूत्रांनी दिली. 

टीएमटीच्या अनेक बस थांब्यावर साधारणपणे किती वेळाने बस उपलब्ध होणार याची फलकावर कायमस्वरूपी माहिती लिहिलेली असते. त्यातही रेल्वेस्थानकावरील मुख्य बस थांब्यावरही अशाच प्रकारे बसच्या वेळेचे फलक रंगविलेले आहेत; पण अनेक बस पंक्‍चर होतात. बसमध्ये काही बिघाड होतो. वाहतूक कोंडीमुळे बसचा खोळंबा होतो, अशा वेळी बस थांब्यावर उपस्थित प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अशा वेळी उपस्थित टीएमटीच्या कर्मचाऱ्यांबरोबर वारंवार रांग सोडून संवाद साधणे प्रवाशांना शक्‍य नसल्याने रांगेत उभे राहून केवळ प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यातच अनेकांना समाधान मानावे लागते; पण यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. 

स्क्रीनच्या सुरक्षेसाठी बॉक्‍स 
महापालिकेच्या परिवहन सेवेतर्फे बस थांब्यावर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून प्रवाशांना धावती माहिती दिली जाणार आहे. यामुळे बसची नक्की स्थिती कळणार असली, तरी या एलईडी स्क्रीनच्या सुरक्षेचा प्रश्‍न मात्र प्रशासनाला सतावत आहे. कारण या स्क्रीनला नुकसान पोहचल्यास ही यंत्रणाच ठप्प पडणार आहे. सध्या या स्क्रीनसाठी काही प्रमाणात सुरक्षेचे बॉक्‍स लावण्यात येणार आहेत.

Web Title: thane news TMT