दंगलीची न्यायालयीन चौकशी - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई -  कोरेगाव-भीमामधील दंगलप्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश याप्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुंबई -  कोरेगाव-भीमामधील दंगलप्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश याप्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. 

दरम्यान, कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. मुंबईत रेल्वे सेवा विस्कळित झाली, तर पुणे, नाशिक, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक शहरांत निषेध मोर्चे काढण्यात आले.  पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला लाखो नागरिक येणार असल्याने पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. मात्र काही समाजकंटकांनी दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा प्रसंग टळला असून, जे यात सहभागी आहेत त्यांचा तपास करून कठोर कारवाई करण्यात येईल. या घटनेत एका २८ वर्षीय युवकाचाही बळी गेल्याची घटना गंभीर असल्याचे स्पष्ट करत या मृत युवकाच्या कुटुंबीयांस १० लाखांची मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर त्याच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. 

महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकारांच्या विचारांचा आहे. कोणत्याही जातीयवादी संघटनांना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविता येणार नाही. यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दलित समाजाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी शांतता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रकरणामागे कोणीही असेल, तर त्यांना सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

मृताच्या नातेवाइकांना १० लाखांची मदत 
घटनेमागे जातीयवादी शक्‍तींचा हात 
मृत्युमुखी घटनेची सीआयडी चौकशी 
सरकारकडून शांततेचे आवाहन

राज्यभरातील पडसाद
  मुंबईत हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी स्थानकात रेल रोको. त्यामुळे वाहतूक सव्वा पाच तास ठप्प.
 सातारा जिल्ह्यात पडसाद, पाच गाड्या फोडल्या
 कोल्हापूर शहरात बिंदू चौकात निदर्शने, रास्ता रोको
 नाशिक जिल्ह्यात जेलरोड, देवळाली कॅम्प भागात दगडफेक
 अमळनेरला सात बस फोडल्या, जळगावला बस जाळण्याचा प्रयत्न
 विदर्भात तीव्र पडसाद, अनेक भागात तणावसदृश स्थिती
 औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड आदी ठिकाणी दगडफेक

पुण्यातील पडसाद 
शहर-पिंपरी चिंचवडमध्ये १८ बस, ६ एसटीवर दगडफेक
बहुतांश शाळा, महाविद्यालये बुधवारी बंद राहणार 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील दोन कार्यक्रम रद्द 
जिल्ह्यातील संवेदनशील भागात इंटरनेट काही काळ बंद  
एसटी-पीएमपी सेवा बुधवारी सुरळीत राहणार  
महापौर, पोलिस आयुक्तांचे शांततेचे आवाहन 
अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन 
मुख्यमंत्र्यांची शहर-जिल्ह्यातील परिस्थितीवर देखरेख

ट्विट
भारतीय समाजव्यवस्थेत दलित समाज सर्वांत तळाशी राहावा, ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक हुकूमशाही प्रवृत्ती कायमच दिसून आली आहे. उनामधील घटना, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि आता कोरेगाव भीमामधील घटना ही याची काही प्रमुख उदाहरणे आहेत.
राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

पिंपरी पोलिसांनी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात अनिता साळवे यांच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल माजविणे, हत्यारबंदी कायदा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- गणेश शिंदे,  पोलिस उपायुक्त (परिमंडळ ३)

Web Title: maharashtra news koregaon bhima Riot devendra fadnavis